<
जळगांव(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करताना दिसत आहे. या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन ठेवण्यात आला आहे. यामध्ये अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. यामुळे सामान्य लोकांची परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने राज्यातील सर्व पुरवठा विभागाला लवकर धान्य वाटपाचे आदेश दिले आहेत. तसेच धान्य देखील वाटप सुरु आहे, मात्र गेंड्याच्या कातडीच्या रेशन दुकानदारांना हिच सुवर्णसंधी सापडली असून ते या काळात सामन्याची पिळवणूक करताना दिसत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाघोदा ता.रावेर याठिकाणी रेशन दुकानदार धान्य कमी देऊन जास्त पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच स्थानिक वार्ताहराने दुकानावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता तिथे घोळ आढळून आल्याने त्यांनी बातमी प्रकाशित केली व त्या बातमीच्या आधारावर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी त्या दुकानाचा परवाना रद्द केला. तर त्यांची फिर्याद देखील पुरवठा निरीक्षक यांच्याकडून नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सत्यमेव जयते चे संपादक दिपक सपकाळे यांना भ्रमणध्वनीवर सांगितले. तसेच रेशन वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं ही ते यावेळी म्हणाले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्या कडुन गैरकारभार करणार्या रेशन दुकानांवर कडक कारवाई होत असल्याने जनमाणसांत समाधान व्यक्त केले जात आहे.