<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 8 – देशाबरोबरच महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना (COVID-१९) या विषाणुचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचा सामना करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतर मदतीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यता भासत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील तसेच राज्यातील सर्वच घटकांना प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे.
प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोंदणीकृत संस्था व न्यासाकडून मदत मिळणे सुरू झाले आहे. मदत जमा करताना कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1950 च्या कलम 41 (सी) मध्ये विहित केलेल्या तरतुदींचा अवलंब केल्याखेरीज कोणाकडूनही निधी रक्कम गोळा करू नये. या तरतुदीचा भंग केल्यास संबंधित व्यक्ती/अनोंदणीकृत संस्था/व्यक्तीसमुह फौजदारी कार्यवाहीस पात्र ठरतात. त्यामुळे जनतेस आवाहन करण्यात येते की, वर्गणी देताना निधीची रक्कम घेणारा व्यक्ती/संस्था/ किंवा व्यक्ती समुह कायदेशीरपणे निधीची रक्कम गोळा/जमा करीत आहेत किंवा नाही याची खात्री करूनच निधी जमा करावा.
सहाय्यता निधीसाठी जमा करावयाची वर्गणी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळ https:cmrf.maharashtra.gov.in/DonationOnlineForm.action चा वापर करून नेट बँकींग/क्रेडीट कार्ड/ डेबीट कार्ड इत्यांदीद्वारेसुध्दा जमा करता येईल. याशिवाय सहाय्यता निधी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अथवा तालुक्याचे तहसीलदार कार्यालयात देखील रोख अथवा धनादेशाद्वारे जमा करता येईल. तरी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, व्यक्ती समूह यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन धर्मदाय उपायुक्त, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.