<
विरोदा(किरण पाटील)- पालघर जिल्ह्यातील गडचींचले या गावी जमावाने दोन संतांची मारहाण करून निर्घृण व क्रूरपणे हत्या करण्यात आली ही घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी अशी आहे. या घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा करावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश संत समितीने येथील उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना दिले. दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी गडचिंचले जिल्हा पालघर येथे दोन संतांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत कोणत्या प्रकारची शहानिशा न करता त्यांच्या विरोधात फिर्याद न देता अत्यंत क्रूरपणे दोन्ही संतांची ठेचून हत्या करण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर या दोघा संतांच्या पार्थिवाला एका मालवाहू गाडीत टाकण्यात आले हे ही निंदनीय असून मृत्यूनंतरही त्यांच्या शरीराची अवहेलना करण्यात आली. हे कृत्य संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात घडले आहे. अशा प्रकारच्या राक्षसी मनोवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. व यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा देऊन यापुढे अशा घटना घडणार नाही यासाठी शासनाने वचक निर्माण करावा अशा मागणीचे निवेदन आज दि. २१ रोजी येथील अखिल भारतीय संत समिती खजिनदार तथा सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, स्वामीनारायण पंथांचे धर्मगुरू शास्त्री भक्ती प्रकाशदासजी, शास्त्री भक्तीकिशोरदासजी, महानुभाव पंथाचे महंत सुरेशशास्त्री मानेकरबाबा यांनी प्रांत डॉ. थोरबोले यांना आज दि. २१ रोजी दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी होले, नगरसेवक देवा साळी, विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, योगेश बोरोले उपस्थित होते.