<
जळगाव, दि. 22 (जिमाका) – यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे टंचाई भासण्याची शक्यता आहे. याकरीता शेतकऱ्यांनी स्वत:कडील राखुन ठेवलेले सोयाबीन हे बियाणे म्हणुन वापर करणेबाबत खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने पेरण्यात येणारे बियाणे सरळ वाणाचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणुन शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. ग्रामबिजोत्पादन पीक प्रात्यक्षिके, शेतकरी समूह इ. कार्यक्रमातंर्गत उत्पादित बियाण्यांचा वापर शक्य आहे. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करुन निवड करावी. सोयाबीन बियाणाची बाह्यआवरण नाजुक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी.
सोयाबीन बियाणे हवेतील आर्दता लवकर शोषून घेते त्यामुळे साठवणूकीचे ठिकाण थंड ओलविरहीत व हवेशीर असले पाहीजे. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यापुर्वी त्याची उगवणक्षमता तपासुन नंतरच अशा बियाण्याची पेरणी करावी. उगवणक्षमता 65 टक्के पेक्षा कमी असल्यास त्याचे त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणी करीता वापरावे. प्रति हेक्टरी सोयाबिन बियाणे दर 75 किलो वरुन 50 त 55 किलोवर आणणेसाठी सोयाबिन बियाणे टोकण पध्दतीने किंवा प्लॅटरचा वापर करावा.
याबाबत शेतकरी बांधवाना काही समस्या असल्यास कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.