
जळगाव (दि. 03 सप्टेंबर 2025) – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर येथे मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला अन्नपदार्थ (गुटखा) वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत तब्बल ₹२,३४,३६०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचला. या वेळी सराळफाटा परिसरात नाकाबंदी करण्यात आली असता, संशयित वाहन तपासणीदरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा आढळून आला.

पोलिसांनी वाहनासह गुटखा जप्त केला असून आरोपी आशिफ राजकुमार जयस्वाल (रा. ग्राम भमोरी, मध्यप्रदेश) आणि आशिफ खान बुल्ला खान (रा. नागपूर, महाराष्ट्र) यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.











