तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर संपन्न


जळगाव, दि. ३ (जिमाका) : तृतीयपंथीय समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी शासकीय योजनांसोबतच त्यांच्या अडचणी समजून घेणारी सहवेदना (Empathy) आणि संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक आहे. तृतीयपंथीयांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगाव यांच्या वतीने तृतीयपंथीय समुदायासाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात विविध शासकीय योजना, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शासकीय सेवांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, तृतीयपंथीयांकडे केवळ लाभार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून त्यांच्या गरजा, अडचणी आणि आकांक्षा समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विविध शासकीय योजनांची एकाच छताखाली माहिती

शिबिरात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी तृतीयपंथीयांना एकाच छताखाली विविध शासकीय योजना व सेवांची माहिती दिली. मतदान कार्ड, रेशन कार्ड तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना तसेच उद्योग आधार/उद्यम नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली.

बँका व आर्थिक महामंडळाच्या प्रतिनिधींनी कर्जपुरवठा, बीज भांडवल योजना, अनुदान व विविध सबसिडी योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपस्थित तृतीयपंथीयांची माहिती घेऊन त्यांना आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यात आले.

तृतीयपंथीयांसाठी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील यांनी केले. स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक बनण्याच्या दिशेने तृतीयपंथीयांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

विभागीय समितीच्या सह अध्यक्ष,शमिभा पाटील म्हणाल्या, समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि त्यांना दैनंदिन जीवनात सहन करावा लागणारा सामाजिक त्रास याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ तसेच समाजाकडून मिळणारी वागणूक या बाबींमध्ये परलिंगी समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने या समस्या केवळ कागदोपत्री न ठेवता त्या संवेदनशीलतेने समजून घेऊन प्रत्यक्ष कृतीतून सोडवाव्यात आणि परलिंगी समाजाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिबिरास निवडणूक शाखेचे तहसीलदार रणजीत कुमावत, संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार प्राजक्ता केदार, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. रमेश थापते, सेंट्रल बँकेचे वरिष्ठ प्रबंधक भारत जाधव, पुरवठा निरीक्षक दिपाली राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाचोरा येथील सीमा जान गुरू, धरणगावच्या नैना भगवान पाटील, चाळीसगावच्या फिजा गुरू तसेच जळगावच्या अंजली गुरु संजना जान यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. गोदावरी संस्थेचे विश्वनाथ पाटील व प्लॅन इंडियाचे अल्केश वाघरे यांच्यासह मोठ्या संख्येने तृतीयपंथीय बांधवांनी शिबिरात सहभाग नोंदविला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाजकल्याण विभागाचे विशेष अधिकारी अमोल कुलकर्णी, अरुण वाणी, चेतन चौधरी, महेंद्र पाटील, अनिल पगारे, शिला अडकमोल यांनी परिश्रम घेतले.








