विलंब झाल्यास प्राचार्य राहणार जबाबदार
जळगाव : तासिका तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या अध्यापकांच्या मानधनाची देयके विहित वेळेत सादर करण्याबाबत उच्च शिक्षण, जळगाव विभागाचे सहसंचालक यांनी महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील ऑक्टोबर २०२६ तसेच प्रलंबित असलेली मानधनाची देयके तातडीने कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उच्च शिक्षण, जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या प्राचार्यांना उद्देशून काढण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीच्या संदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून, शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ अन्वये संबंधित अध्यापकांना अदा करावयाच्या मानधनाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार मानधनाची देयके विहित वेळेत सादर करण्याबाबत यापूर्वीही वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता.

मात्र, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके निर्धारित वेळेत कार्यालयात सादर करण्यात आलेली नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी ऑक्टोबर २०२६ चे तसेच यापूर्वी प्रलंबित असलेले मानधनाचे देयके परिपूर्ण प्रस्तावासह तातडीने सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

देयके सादर करण्यात विलंब झाल्यास संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य सर्वस्वी जबाबदार राहतील, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संबंधित महाविद्यालयांचे माहे ऑक्टोबर २०२६ पेड इन नोव्हेंबर २०२६ या वेतन देयकांचा स्वीकार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

या निर्देशांमुळे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील संबंधित महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाच्या देयकांची पूर्तता करून ती वेळेत सादर करणे आवश्यक झाले आहे.








