जळगाव दिनांक 22 जून (जिमाका) : केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. २७ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करणे आवश्यक असल्याबाबत यापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले होते.

मात्र अद्यापपर्यंत संजय गांधी योजना, नपा क्षेत्र जळगाव शहर अंतर्गत लाभ घेणाऱ्या एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ ४० टक्के लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर केले आहेत.

त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना पुनश्च आवाहन करण्यात येत आहे की, लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सत्यापन अॅप उपलब्ध असल्यास त्याद्वारे किंवा नातेवाईकांच्या मदतीने तसेच संजय गांधी योजना कार्यालय, नपा क्षेत्र जळगाव शहर, रेल्वे स्टेशन रोड येथील ग्राम महसूल अधिकारी, कार्यालयातील संगणक परिचालक कर्मचारी अथवा जवळील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत हयात प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून ते दि. ३० जून २०२६ पर्यंत संजय गांधी योजना कार्यालय, नपा क्षेत्र, जळगाव शहर, रेल्वे स्टेशन रोड येथे जमा करावे.

निर्धारित मुदतीत हयातीचा दाखला सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान बंद होऊ शकते त्यामुळे हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन तहसीलदार रुपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.










