जळगाव-(प्रतिनिधी ) – येथील चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पी. ई. तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयांचा वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी) अत्यंत उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याला जळगाव शहराचे आमदार मा. श्री. राजूमामा भोळे, माजी पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव देवकर, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, सुप्रीम इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष मा. श्री. सुरेशजी मंत्री, डॉ. सुरेश पाटील, किड्स गुरुकुलचे चेअरमन मा. आदेश लालवणी, रेडक्रॉसचे मा. सुभाषजी साखला, नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा. अजित वाघ आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्या पाटील, उपाध्यक्ष सौ. निर्मलाताई पाटील, सचिव मा. राहुल पाटील व मा. भूषण पाटील यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
स्नेहसंमेलनात होमिओपॅथी, फार्मसी, नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवले. नृत्य, नाटक, गायन, कविता वाचन आणि वाद्य संगीताच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा’ या ऐतिहासिक नाटकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, जे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

मार्गदर्शन व शुभेच्छा
याप्रसंगी बोलताना आमदार राजूमामा भोळे व गुलाबराव देवकर यांनी तात्यासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मा. श्री. पी. ई. तात्या पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी, डॉक्टर आणि प्राध्यापकांना भविष्यातील वाटचालीसाठी प्रोत्साहित केले व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.

या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधांशु सिंग, डॉ. मनीषा टोनपे, डॉ. समीक्षा वारके, मनीषा बडगुजर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











