<
हल्ली सर्वीकडे हे बघण्यास मिळत आहे की इथे वृक्षारोपण केले तिथे वृक्षारोपण केले. वाह्ह हि नक्कीच एक कौतुकास्पदच बाब आहे. पण संवर्धन किती वृक्षांचे केले? खरं तर हा प्रश्नच राहतो.तर मित्रानो आपल्याला वृक्ष तर लावायचेच आहेत ती आपली एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हुणुन आपली जबाबदारीच आहे पण त्या वृक्षांचे संवर्धन करणे सुद्धा आपलं दायित्व आहे. पर्यावरण वाचवा, वृक्ष लागवड करा, वसुंधरा वाचवा अशा प्रकारच्या घोषणा देऊन आज समाजात जनजागृती करायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. खरतर हि एक दुर्दैवाचीच बाब आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर पृथ्वी नष्ट व्हायला काही वेळ लागणार नाही म्हणजे सजीव सृष्टीचं संपेल हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण लक्ष देत नाहीत या गोष्टीसाठी जनजागृती करावी लागते तरी आपण तसं वागत नाही हि खरी शोकांतिका आहे. आपल्याला जर आपली वसुंधरा अशीच हिरवा शालू परिधान करून सजीव सृष्टीचं संगोपन करणारी हवी असेल तर आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. तेव्हाच हि पृथ्वी खऱ्या अर्थाने वसुंधरा म्हटली जाईल. आपण वृक्षारोपण करतो पण मुळात जी पद्धतीचा आपण वापर करायला हवा तो वापर आपण करत नाही.कोणते वृक्ष किंवा रोप आपण कुठे लावायला हवे हे पण आपण समजून घेतले पाहिजे. म्हणजे आपले पर्यावरण समृद्ध होईल. पावसाळा हा वृक्षारोपणासाठी योग्य काळ समजला जातो. पण वृक्ष लावताना योग्य झाडांची निवड केली पाहिजे. वड, पिंपळसारख्या वृक्षांमध्ये प्रदूषण कमी करण्याची व हवा स्वच्छ करण्याची भरपूर ताकद आहे. पण शहरांत पुरेशी जागा नसते. शहरांत दुतर्फा लावण्यासाठी सप्तपर्णी, तामण, कडुलिंब, कांचन, आसुवालव, बकुळ, अशोक हे वृक्ष लावावे. यावर पक्षी घरटे बांधतात उन्हाळ्यात थंडावा वाटतो. मंदिराच्या परिसरात व स्मशानाजवळ वृक्षारोपण करावे. बेल, गुलमोहर, जास्वंद, प्राजक्त हि झाडे लावावीत. घराच्या अंगणात सीता, अशोक, कडुलिंब, कारंज, बदाम, समुद्रफळ, पाम, सातवीण, तामण, नागकेशर, अर्जुन हि वनौषधी झाडे लावा. मोकळ्या जागांवर गुंज, मधुवासी, मेहंदी, हिरडा, बेहडा, आवळा, शंकासुर, अडुळसा, हि झाडे लावा, लागवडीसाठी कुठल्या प्रजातीची कुठे लागवड करावयाची आहे याचे नियोजन करावे. जमिनीच्या मुगदूराप्रमाणे, खोलीप्रमाणे, खड्ड्याचे आकारमान ठरवून घ्यावे खड्डे पावसाळ्यापूर्वीच खोदलेले असतील तर उत्तम. रोप लागवडीच्या वेळी ब्लेडने पिशवी अलगद फोडावी. मातीचा गड्डा फुटणार नाही याची काळजी घ्यावी. अलगद रोप उचलून खड्डा खणलेल्या ठिकाणी लागवड करावी रोपाभोवती अलगद बाजूने माती ओढावी पायाने माती रोपाभोवती अलगद दाबावी. त्यानंतर ओळे करून पाणी द्यावे.नियमित पाणी द्यावे गुरांपासून संरक्षण इ चे व्यवस्थापन केल्यास वृक्षारोपणाची उद्दिष्ठे साध्य होण्यास मदत होईल. वृक्षारोपण करताना एक अत्यंत महत्वाची काळजी घ्यावी आणि ती म्हणजे फक्त स्थानिक व किफायतशीर झाडेच लावावीत. कारण आपली स्थानिक जैवविविधता वाचविणे खूप गरजेचे आहे. स्थानिक झाडे लावून नैसर्गिक पुनर्जीवन केल्यास आपल्या परिसरातील जैवविविधता वाढेल. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की स्थानिक झाडांची पानगळीतूनच फक्त सुपीक माती तयार करण्याचे काम सूक्ष्मजीव करतात. स्थानिक झाडेच जास्त प्रमाणात ऑक्सिजन व ओझोन देण्याचे काम करतात व वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. स्थानिक झाडे जैवविधतेचे संरक्षण करतात म्हणून त्यांना देववृक्ष असेही म्हणतात. यात वड,उंबर, पिंपळ, चाफा, तुळस, पारिजातक, शमी, चिंच, अशी झाडे आहेत. कारण या झाडातून ओझोन वायू जास्त प्रमाणात सोडला जातो.
“झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा..!
-मनोज भालेराव (शिक्षक)
प्रगती विद्यामंदिर, जळगाव
मो.नं. 8421465561