<
मुंबई – सुशीलकुमार सावळे
महानगरपालिका आयुक्त पदाची सुत्रं काल सायंकाळी स्वीकारल्यानंतर आयुक्त श्री. इकबाल सिंग चहल यांनी मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय आणि धारावी परिसर या दोन्ही ठिकाणी आज भेटी देऊन कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. स्वसंरक्षण वेश परिधान करुन थेट अतिदक्षता कक्षात रुग्णांची विचारपूस करतानाच कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क करा, असा सल्ला रुग्ण, डॉक्टर्स, निम्न-वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱयांनाही देऊन आयुक्तांनी साऱयांचे मनोबल वाढवले. तसेच अधिकाधिक नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नवनियुक्त आयुक्त श्री. चहल यांनी काल (दिनांक ८ मे २०२०) सायंकाळी उशिरा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, उप आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यांनी प्रामुख्याने कोरोना संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. आज (दिनांक ९ मे २०२०) सकाळी महानगरपालिका मुख्यालयातून आयुक्त श्री. चहल हे बाई यमुनाबाई नायर धर्मादाय रुग्णालयात पोहोचले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी हेदेखील उपस्थित होते. प्रारंभी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी नायर रुग्णालय निर्देशित कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत करण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. सध्या या रुग्णालयात ५३१ खाटा कोविड बाधितांसाठी आहेत. यामध्ये ५३ अतिदक्षता विभागात आहेत. तर, ११० खाटा गर्भवती महिलांच्या प्रसुतिसाठी उपलब्ध आहेत. मागील २२ दिवसांत ४४ महिलांची प्रसुति सुखरुपणे पार पडली आहे. तर, एकूण २७ डायलिसिस युनिट कोरोना बाधितांसाठी उपलब्ध आहेत, अशी माहितीही डॉ. जोशी यांनी दिली. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करुन आयसीएमआर यांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचेदेखील डॉ. जोशी यांनी नमूद केले.
सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर आयुक्त श्री. चहल यांनी रुग्णालयाच्या सर्व तज्ञ डॉक्टरांशी मनमोकळी चर्चा केली. विविध बाबींवर शंका-निरसन करुन घेतल्यानंतर ते म्हणाले की, या प्रश्नोत्तरातून देण्यात आलेले निर्देश रुग्णालय प्रशासनाने अंमलात आणावेत. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र, अथक प्रयत्न करत असलेल्या वैद्यकीय मंडळींना व्यक्तिशः धन्यवाद देतो. आरोग्य यंत्रणेला माझा सर्वतोपरी पाठिंबा आहे. तथापि, उपचार, आरोग्य सेवा यामध्ये कोणतीही त्रुटी राहता नये. अडचणी असल्यास प्रशासनाशी संपर्क करु शकता, असे आयुक्तांनी सांगितले.
यानंतर आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी स्वसंरक्षण वेश (पीपीई कीट) परिधान करुन थेट कोरोना बाधितांवर उपचार सुरु असलेल्या कक्षात जाऊन पाहणी केली. अतिदक्षता कक्षामध्ये प्रत्यक्ष कोरोना बाधितांपर्यंत जाऊन वैयक्तिकरित्या विचारपूस केली. रुग्णालयाकडून मिळणारे उपचार, प्रकृतीत झालेली सुधारणा, औषधे व अन्नपुरवठा या संदर्भात रुग्णांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. कोरोना बाधेसह इतरही आजार असलेल्या रुग्णांना धीर देत आयुक्तांनी कुठल्या सुधारणांची आवश्यकता आहे, हेदेखील विचारले. रुग्णालयातील परिचारिका, निम्न-वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांचीदेखील कर्तव्ये जाणून घेत कोणत्या सुविधांची आवश्यकता असल्यास अथवा अडचणी असल्यास प्रशासनाला ताबडतोब कळवावे, असे सांगून त्यांचेही मनोबल वाढविले.
नायर रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर आयुक्त श्री. चहल यांनी जी/उत्तर विभागातील धारावी येथे मुकुंद नगर व शास्त्री नगर या परिसरांमध्ये भेट दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी संपूर्ण तपशील आयुक्तांसमोर सादर केला. धारावीमध्ये झोपडपट्टी व दाट वस्ती असलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्राजवळ जाऊन प्रत्यक्ष नागरिकांशी श्री. चहल यांनी संवाद साधला. सार्वजनिक शौचालयांची पाहणी केल्यानंतर तेथील व्यवस्था सांभाळणाऱया संस्थांच्या प्रतिनिधींना आयुक्तांनी निर्देश दिले. शौचालयांची नियमित सफाई, निर्जंतुकीकरण योग्यरित्या झाले पाहिजे, पुरेसे हँडवॉश उपलब्ध असावेत, अशा सूचना केल्या. मुकुंद नगरात प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी करित असताना लॉकडाऊनचे पालन योग्यपणे झाले पाहिजे, यासाठी उपस्थित पोलिस वर्गासदेखील आयुक्तांनी निर्देश दिले. प्रतिबंध असलेल्या इमारती व घरे यांच्या नजिक जाऊन नागरिकांशी श्री. चहल यांनी विचारपूस केली. जेवण, रेशन, भाजीपाला, औषधे आदी बाबींचा पुरवठा कसा होतो किंवा काय अडचणी आहेत, याची त्यांनी विचारणा केली. एका खासगी दवाखान्याच्या डॉक्टरांशी चर्चा करुन रुग्णांना योग्यरित्या महानगरपालिकेकडे संदर्भित करण्याविषयी त्यांनी सूचना केली. तर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राच्या कर्मचारी श्रीमती स्वप्नाली गायकवाड यांनाही कार्यपद्धतीविषयी प्रश्न विचारुन वस्तुस्थिती जाणून घेतली. कोरोना बाधितांच्या नजिकच्या संपर्कात येणाऱया अधिकाधिक व्यक्तिंना शोधून संस्थात्मक अलगीकरण (Institutional Quarantine) सुविधेमध्ये आणावे, अशी सूचना श्री. चहल यांनी केली.
धारावीसारख्या विभागात इमारती आणि झोपडपट्टी / दाट वस्ती यात आढळणाऱया रुग्ण संख्येचे वर्गीकरण करावे. इमारतींमध्ये शक्य असल्यास घरी अलगीकरण करावे. अन्यथा संस्थात्मक अलगीकरण सुविधेमध्ये जास्तीत-जास्त लोकांना नेण्यात यावे, असे निर्देश श्री. चहल यांनी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दिले.