मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
लॉकडाऊन सुरू होवून ४५ दिवस झाले तरी मुलुंड, भांडूप, पवई मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही आहे. प्रत्येक दिवशी रुग्ण आढळत आहेत त्यामुळे प्रशासनासाठी देखील ही चिंतेची बाब झाली आहे. कोणाचे काय चुकत आहे, कोठे कमी पडत आहोत, नियोजनात चुका होत आहेत की निर्णय प्रक्रियेत चुका होत आहे की घेतलेल्या निर्णयाची योग्य तर्हेने अंमलबजावणी होत नाही आहे. या सर्वांना जबाबदार कोण ? प्रशासन, पालिका, पोलिस, लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था की सामान्य नागरिक ? मुलुंड, भांडूप, पवई येथील कोरोनाबाधित रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी या सर्वच घटकांनी विचार करण्याची वेळ आली आहे.
सामान्य नागरिक अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी रस्त्यावर येताना दिसत आहे. सकाळपासून दुपारपर्यंत रस्ता लोकांच्या गर्दीने फुललेला असतो. तसेच संध्याकाळी मेडिकल दुकाने उघडी असतात म्हणून त्यावेळी देखील औषधे खरेदीच्या बहाण्याने लोकं रस्त्यावर येतात. काही कॉलनी, मोठ्या सोसायटय़ा येथे सर्रास रहिवासी फिरत असताना, गप्पा मारताना दिसत असतात. भाजीपाला खरेदी, अन्नपदार्थ विक्रीची दुकाने, धान्य विक्रीची दुकाने, दूध विक्री केंद्र, मेडिकल स्टोअर्स, चिकन-मटण सेंटर, बँका येथे सर्वत्र मोठ्या रांगा लागलेल्या प्रत्येक दिवशी दिसते. कोरोना संसर्गाने होतो हे माहीत असून देखील नागरिक चारचाकी, दुचाकी घेवून तर काही चालत खरेदीसाठी बाहेर पडताना दिसतात. युवा वर्ग, पुरुष मंडळी खरेदीच्या बहाण्याने बाहेर पडत असतात. खरेदीसाठी, विनाकारण बाहेर पडणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण यात खूपच कमी दिसून येत आहे त्यामुळे कोरोनाला रोखण्याच्या लढाईत महिला वर्ग खूपच समजूतदारपणा दाखवत शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत आहेत.
मोठ्या प्रमाणात लोकं रोज खरेदीसाठी बाहेर पडताना दिसतात, तर काही विनाकारण नुकतेच फिरण्यासाठी, घरात बसून कंटाळा आला म्हणून बाहेर आलेले दिसतात. स्टेशन समोरील रस्त्यावर सकाळच्या वेळेत गाड्यांची मोठी गर्दी दिसते. नागरिकांना प्रशासनातर्फे वारंवार आवाहन केले जात आहे, फ़क्त अत्यावश्यक खरेदीसाठीच किंवा कामांसाठीच घराबाहेर पडा अन्यथा कोरोनाला रोखण्यासाठी घरातच थांबा तरीदेखील एवढी लोकं सकाळ पासून दूपारी २ वाजेपर्यंत रस्त्यावर येण्याची काय आवश्यकता आहे? एकदाच आठवड्याभराला लागणाऱ्या आवश्यक सामानांची खरेदी करणे शक्य नाही का ? महिन्याभराचे रेशन व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी लॉकडाऊन पूर्वी महिन्यातून एकदाच बहुतेक जण करत होते, तीच पद्धत आता या कठीण काळात देखील सर्वांनीच अवलंबली तर काही नुकसान होणार आहे का ? प्रत्येक दिवशी घराबाहेर पडायची काय आवश्यकता आहे ? मान्य आहे घरात बसून कंटाळा येतो तरी देखील कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने सांगितल्याप्रमाणे घरातच अजून थोडे दिवस बसले तर बिघडले कुठे ? लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच सर्व नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करुन अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडलेच नसते तर शासनाला देखील लॉकडाऊन वाढवायची आवश्यकता लागली नसती. परंतु शासनाच्या आदेशाचे पालन न करता आपणच आपले नुकसान करुन घेत आहोत हे नागरिकांना विशेषतः आजच्या जमान्यातील हुशार, स्मार्ट तरुण पिढीला का समजत नाही आहे. दुचाकी किंवा चालत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुण मुलेच जास्त दिसत आहेत.
पालिका प्रशासनाने देखील विशेष लक्ष घालून नियमांप्रमाणे सर्व चालले आहे की नाही याचे रोजच्या रोज निरिक्षण करण्याची आवश्यकता आहे, परंतु ते होताना दिसत नाही आहे. आपल्या विभागातील जी दुकाने बंद असणे आवश्यक आहे ती खरोखरच बंद आहेत का व चालू असतील तर अश्या दुकानांवर कडक कारवाई केली जाते आहे का, चालू असलेल्या दुकानात कोरोनासंबंधित शासकीय नियमांचे पालन होत आहे का, दुकानातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक तर नाही ना, ग्राहक योग्य अंतर ठेवून आहेत ना हे पालिका अधिकाऱ्यांनी अचानक भेट देवून तपासणे गरजेचे आहे. सरकारी दवाखान्याबाहेर नेहमीच लोकं रांगेत उभी असताना दिसतात याचा पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी काही अभ्यास केला आहे का ? ही गर्दी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार करण्याची जरूरी आहे. पालिका प्रशासनाला देखील काही जागरूक नागरिक, काही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी सूचना, प्रस्ताव देत असतात, त्यातील योग्य त्या महत्वाच्या सूचनांना केराची टोपली न दाखवता गंभीरतेने विचार होणे जरूरीचे आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून, पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनांचा विचार करणे जरूरीचे आहे कदाचित त्यातून एखादी चांगली संकल्पना निघून ती राबवली तर कोरोनाला मुलुंड, भांडूप, पवई मधून हद्दपार व्हायला निश्चितच मदत होवू शकते.
भाजीपाला, फळे रस्त्यावर विकण्यास परवानगी नाही आहे तरीही काही रस्त्यांवर, मैदानात खुलेआम भाज्या विकल्या जात आहेत. टेम्पोतून भाजीपाला, फळे विकली जात आहेत, काही दुकानातून भाज्या विकल्या जात आहेत. या ठिकाणी खरेदीसाठी अनेकदा गर्दी होत आहे. प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी भाजीपाला, फळे विकण्यास बंदी आणली असूनही राजरोसपणे ही विक्री होत आहे, हे प्रशासनाला दिसत नाही का? यासंबंधीच्या अनेक तक्रारी जागरूक नागरिकांनी पालिकेकडे, पोलिसांकडे केल्या आहेत. यापैकी किती तक्रारीवर पालिकेनी कारवाई केली ? जर कडक कारवाई या भाजीपाला, फळे विक्रेत्यांवर झाली असती तर रोज हे भाजीपाला विक्रेते पुन्हा त्याच जागी बसलेले दिसले नसते. या भाजीपाला विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आहे त्यामुळे येथे गर्दी होवून कोरोनाचा प्रसार होवू शकतो हे प्रशासनाला माहिती असूनही उमजत का नाही. मान्य आहे की पालिकेकडे कर्मचारी वर्ग अपुरा आहे परंतु कोरोणाची संख्या शून्यावर आणण्यासाठी उपलब्ध कर्मचारी वर्गाद्वारेच पालिकेला सर्वत्र नियमांचे पालन होत आहे की नाही याचे निरिक्षण करणे व कारवाई करणे जरूरीचे आहे.
पोलिस गेल्या ४५ दिवसांपासून सतत कार्यरत आहेत त्यामुळे ते देखील दमले असतील हे मान्य आहे परंतु इतर सोय होत नाही तोपर्यंत त्यांनी कठोरच राहणे खूप जरूरीचे आहे व रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. कोरोनासंबंधित शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यां नागरिकांवर, दुकानदारांवर, भाजीपाला विक्रेत्यांवर तातडीने योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. जो तो रस्त्यावर गाडय़ा घेवून येत, वाटेल तशी पार्किंग करुन जात आहे अश्या नियमबाह्य़ वर्तन करणाऱ्या गाडीचालकांवर कारवाई होणे जरूरीचे आहे. कोरोनाला मुलुंड, भांडूप, पवईमधून हद्दपार करायचे असेल तर पोलिसांचीच भूमिका महत्त्वाची असणार आहे. नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांना पोलिसांची अधिक भीती वाटत असते परंतु पोलिसांच्या ओळखीचा फायदा घेवून गैरकाम यांच्याकडून होत असते त्यामुळे पोलिसांनी ओळख न दाखविता, कोणत्याही दबावात न काम करता या कठीण परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी कायदयाने कडक भूमिका घेवून राहणे जरूरीचे आहे. पोलिस सर्वच ठिकाणी पोहचू शकत नाही परंतु एखाद्या ठिकाणी गर्दी होत असेल किंवा नियमबाह्य काही चालत असेल तर अश्याची तक्रार जागरूक नागरिकांनी केल्यावर पोलिसांनी ताबडतोब तेथे पोचून पूर्ण चौकशी करुन नियम मोडणारी व्यक्ती ओळखीची असेल तरी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे.
लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील रोज रस्त्यावर फिरून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यां नागरिकांना समजावून सांगून नियमांचे पालन करण्याचे सातत्याने आवाहन करणे जरूरीचे आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना रोखण्याचे महत्वाचे काम प्रशासनाच्या हातात हात घालून एकत्र मिळून करण्याची वेळ आली असून, सर्वांनी एकजुटीने, जबाबदारी ओळखून कोरोना विरोधाच्या लढ्यात नाही उतरले तर मुलुंड, भांडूप, पवई मधून कोरोना हद्दपार होणे मुश्किल आहे त्यामुळेच एस आणि टी विभागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाला साथ देत सर्वांनीच शासनाने सांगितलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे अतिशय जरूरीचे आहे.