<
“मरके कैसे जिते है,इस दुनिया को दिखलाने,
तेरे लाल चाले है माये,अब तेरी लाज बचाने !”
‘इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी देशभक्तानी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्याना आठवण्याचा हा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट अर्थात ‘क्रांतिदिन..!’ स्वतंत्रलढ्याची मशाल पेटवत,देशातून ब्रिटिश राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतीकारकांना अभिवादन… !
स्वातंत्र….. स्वातंत्र….. आता पाहिजे फक्त स्वातंत्र अशी भावनाच सर्वांच्या मनात पेटली. आणि मुंबईत भरलेल्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी केलेली ‘छोडो भारत’ हि गर्जना आणि ‘करेंगे या मरेंगे’ हा मूलमंत्र 9 ऑगस्ट च्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता.त्यामुळे या दिवशी क्रांतीची एक ज्योतच सर्व मनामनात व देशभरात पसरली होती. संपूर्ण देशात ब्रिटिश सत्येला हुसकावून लावण्यासाठी जागोजागी आंदोलनांना सुरुवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. हे बघून ब्रिटिश सरकार पुरती हादरून गेली. हे रोखायचे कसे? काय करावे हा प्रश्न त्यांना पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या दिवशी रात्रीच्या भाषणात मिळाल्याने इंग्रजांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतले. यावेळी गांधींजीनी संपूर्ण जनतेला संदेश दिला ‘आता प्रत्येक व्यक्तीच पुढारी होईल.’ ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केले होते. त्या सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्ता ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. ब्रिटिश सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. सर्वांना समजून चुकलंच की गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद, या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले आहे हे समजले. नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे, यांना ऊत आला. सरकारने यावर तोडगा म्हणून लोकांच्या एकत्र जमण्यावर बंदी घातली. पण लोकांच्या लोकांच्या मनात पेटलेला वणवा स्वातंत्र मागत होता. लोक काही ऐकत नव्हते आदेश मानायला तयार होत नव्हते. पोलीसांच्या लाठीमाराला, गोळीबाराला, न घाबरता न जुमानता आंदोलन तीव्र करत होते. जाळपोळ, पोलिसांवर हल्ले, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरु झाले. जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात. सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्याची लुटालूट असे प्रकार सुरु होते. ब्रिटिश सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता. अशा या देशासाठी मरण पत्करणार्यांना आठवण करण्याचा हा दिवस. दीडशे वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशाना देशातून हुसकावून लावण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती.या लढ्यात ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून 9 ऑगस्ट क्रांतिदिन म्हणून पाळला जातो. ‘दिन आज का बडा सुनहरा,मौसम भी कितना गहरा, हम सरपे बांध के आये,बलिदानो का ये सेहरा! बेताब हमेशा दिलं मैं, इक मस्तीसी छाई है, ये देश अलविदा तुझको,कहने की घडी आई है !’
-मनोज भालेराव (शिक्षक )
प्रगती विद्यामंदिर,जळगाव
मो नं. 8421465561