<
जळगांव(चेतन निंबोळकर)- “स्वच्छ भारत…स्वच्छ शहर”चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडूनआवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, जळगांव शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.
सध्या करोना सारख्या विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नागरिक कोरोना पासून बचावाकरिता सांगण्यात येणाऱ्या उपायांचे नियोजन गांभिर्याने करण्यावर भर देत आहेत. मात्र कोरोनाला रोखण्याकरिता नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना या कोरोनाला रोखण्यास फायदेशीर ठरतीलही. मात्र हेच होत असताना शहरातील असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे शहरवासियांना भोगावे लागतील. तेव्हा शासनाच्या लाखो-करोडो रुपयांच्या स्वच्छतेकरिता येणाऱ्या निधीचा काय उपयोग? आता नागरिकांमध्ये कोरोनाच्या पाठोपाठ अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या भितीने नागरिकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली आहे.
मनपाचे पगारी अधिकारी व निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांमध्ये याकडे लक्ष कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अस्वछतेला नागरिकही तेवढेच जबाबदार
अस्वच्छतेचा सर्वाधिक परिणाम होतोय तो पर्यावरणावर त्यामुळे पर्यावरण देखील माणसाची साथ सोडत चाललाय. यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, ही अस्वच्छता निर्माण करण्यास नागरिकच सर्वाधिक जबाबदार आहेत. आपले घर स्वच्छ ठेवायचे आणि परिसरात मात्र घाण करायची, ही मनोवृत्ती पर्यावरणासाठी सर्वाधिक घात ठरत असल्याचे मत व्यक्त केले जाते.