<
यूनिसेफच्या माहितीनुसार, मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी संवाद वाढवण्याची गरज आहे. असे असूनही याबाबतीत खूप कमी प्रयत्न झाले असल्याचे दिसून येते.
भारतामध्ये ‘मासिक पाळीतील स्वच्छता आणि आरोग्य’ या महत्वाच्या आरोग्याच्या मुद्द्याविषयी समाजामध्ये खूप कमी बोलले जाते. स्वच्छतागृह, सॅनिटरी नॅपकिन आणि मासिक पाळी विषयीच्या माहितीच्या अभावामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. ‘वॉटर एड, इंडिया’ संस्थेच्या २०१० च्या अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या महिलांपैकी ७ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात तर ५० टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकिनच्या वापराबद्दल माहिती नाही.
मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने चर्चा करणं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये अजूनही निषिद्ध मानलं जातं. मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांवर अनेक बंधनं असतात. बऱ्याचदा मुली सॅनिटरी नॅपकिन किंवा उन्हात स्वच्छ वळविलेले कपडे वापरताना दिसत नाहीत. अनेक मुली जुने कापडाचे तुकडे किंवा अस्वच्छ चिंध्या वापरताना दिसतात ज्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो.
स्वच्छ कपडा किंवा सॅनिटरी नॅपकिन आणि शाळांमध्ये शौचालयांचा अभाव यामुळे मासिक पाळी सुरु झाल्यांनतर मुलींची शाळेमध्ये अनुपस्थिती आणि गळती वाढते.
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने ‘मासिक पाळी आरोग्य आणि व्यवस्थापन’ याविषयीची राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वं देऊनही खूप काही बदल झाल्याचे दिसत नाही. युनिसेफच्या २०१२ च्या अहवालानुसार, ८७ टक्के महिला पाळीमध्ये चिंध्या वापरतात, ७९ टक्के महिलांचा आत्मविश्वास कमी होतो तर ६० टक्के मुलींना शाळा सोडावी लागते. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘मासिक पाळी आरोग्य आणि व्यवस्थापन’ हा सामाजिक प्रश्न असून, कुटुंबातील आणि समाजातील आढळणारी जाचक बंधनं आणि नियम बदलण्याची गरज आहे. मासिक पाळीमध्ये स्त्री अपवित्र असते, हे स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये खूप खोलवर रुजलं आहे. मासिक पाळी संबधित गैरसमजुती तसेच यासोबत जोडला गेलेला कलंक जर दूर करायचा असेल, तर याविषयीची ‘चुप्पी’ तोडण्याची गरज आहे. सरकारी अधिकारी व शिक्षकांनी योग्य प्रकारे या विषयावर बोलण्याचे मार्ग शोधण्याची आणि इतर आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे. महिलांना याविषयी मोकळेपनानं बोलण्यासाठी, योग्य तो शास्रीय माहिती मिळण्यासाठी मनमोकळी स्पेस, जागा नसते. ग्रामीण भागामध्ये महिला गटांच्या माध्यमातून अशी जागा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. यासाठी महिला बचत गट, आशा, आरोग्य सखी यांचा सहभाग घेता येईल. सुरुवातीला काही महिलांना याविषयीचे प्रशिक्षण देऊन त्यांना इतर किशोरवयीन मुलींमध्ये आणि महिलांमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहन देता येईल. मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी समुदायामध्ये मनमोकळा संवाद आवश्यक आहे.
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality