<
जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न
जळगाव, दि. 14 – शिधापत्रिकेवरील धान्य वितरणासंबंधी तक्रारींची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून यापुढे नागरीकांना वितरणासबंधीच्या तक्रारी 9307592572 या व्हॅटसॲप क्रमांकावर पाठविता येणार आहे. या क्रमांकावर आलेल्या तक्रारींचे पुरवठा विभागामार्फत तात्काळ निवारण करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिलेत.
जिल्हास्तरीय दक्षता समितीची मासिक बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच सभागृहात पार पडली. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा उपनिबधंक, सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष यांचेसह अशासकीय सदस्य सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, डॉ. श्रीमती.अर्चना पाटील, सुलभा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, धान्य वितरणाबाबत समितीच्या अशासकीय सदस्यांनी नागरीकांना येत असलेल्या अडीचणी बैठकीत मांडल्या. याची तातडीने दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली. वितरणासंबंधीच्या तक्रारींसाठी नागरीकांना तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून अर्जाद्वारे आपल्या अडीअडचणी मांडाव्या लागतात. यामध्ये नागरीकांचा वेळ वाया जातो. तसेच याकीरता त्यांना गावाहून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अशा तक्रारी व अडीअडचणी सोडविण्यासाठी यापुढे व्हॅटसॲपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नागरीकांनी या क्रमाकांवर तक्रारी मांडल्यास या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याच्या सुचनाही पुरवठा विभागास दिल्या आहेत.
नागरीकांनी रेशनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर विहित कालमर्यादेत त्यांचा अर्ज मंजूर अथवा नामंजूर झाल्याचे तहसील कार्यालयांने कळविणे आवश्यक आहे. तशा सुचना तहसीलदारांना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिलेत. कुठल्याही नागरीकाला शिधापत्रिका घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागू नये याकरीता पात्र लाभार्थ्यांच्या शिधपत्रिका त्यांना यंत्रणेमार्फत घरपोच कराव्यात. शिधापत्रिकेवर धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या नोंदी परिपूर्ण कराव्यात. त्याचबरोबर काही दुकानदार नागरीकांना रेशन कार्डवर तहसील कार्यालयातून शिक्का मारुन आणण्यास सांगतात अशी तक्रार सदस्यांनी बैठकीत केली असता कार्डवर कुठल्याही शिक्क्याची आवश्यकता नसल्याचेही बैठकीत सांगण्यात आहे. त्याचबरोबर काही रेशन दुकाने ज्या व्यक्तींच्या नावावर आहेत ते चालवित नसून इतर दुसऱ्या व्यक्ती चालवित असल्याच्या तक्रारीही बैठकीत केल्या असता याबाबतची तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत पुरवठा विभागास दिलेत. यावेळी मागील बैठकीत मांडण्यात आलेल्या विषयांवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.