<
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न
जळगाव, दि. 14 – ग्राहकांनी आपली फसवणुक होवू नये याकरीता बाजारातून महत्वाच्या वस्तुंची खरेदी करतांना त्याची पावती (बील) घ्यावी. जेणेकरुन भविष्यात ती वस्तु गॅरटी/वॉरंटी कालावधीत खराब निघाल्यास बदलून घेता येणे सोईचे होते. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यो. को. बेंडकुळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, वैधमापन शास्त्र विभागाचे अ. आ. जगताप, दूरसंचार विभागाचे एस. डी. उमराणी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचेसह अशासकीय सदस्य विकास महाजन, डॉ.अर्चना पाटील, सौ.पल्लवी चौधरी, ॲड.मंजुळा मुंदडा,
साहित्यिक अ. फ. भालेराव, रमेश सोनवणे, बाळकृष्ण वाणी, कल्पना पाटील, नरेंद्र पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, अनेक नागरीक वस्तु खरेदी करतांना बील घेत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. तसेच वस्तु खराब निघाल्यास व बील नसल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात अडचणी येतात. त्यामुळे नागरीकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी विक्रेत्याकडे बीलाची मागणी करावी. शहरात अनोंदणीकृत अनेक रिक्षा आढळून येतात. त्यांचेवर कारवाई सुरु असूनआतापर्यत परिवहन विभागाने 200 रिक्षांवर कारवाई केल्याची माहिती सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी बैठकीत दिली. तसेच ज्या रिक्षांची नोंदणी केलेली नाही अशा रिक्षा तातडीने स्क्रॅप करण्यात येत असल्याचेही बैठकीत सांगितले. अनेक रिक्षाचालक परवानगीपेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरीकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविताना तसेच जे रिक्षाचालक नियमांचे पालन करतात. त्यांच्याच रिक्षातून पाठवावे. अथवा शाळेच्या स्कुलबसमधूनच पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केले.
ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून कार्यवाही सुरु आहे. यानंतरही काही नागरीकांची फसवणूक होत असल्यास त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी मागील बैठकीत अशासकीय सदस्यांनी केलेल्या तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. यामध्ये नोंदणी नसलेल्या खाजगी कोचिंग क्लासेसवर बंदी आणणे, चायनीज खाद्यपदार्थांची तपासणी करणे, ठेवीदारांच्या पतसंस्थाकडे अडकलेल्या ठेवी परत मिळणे आदि विषयांचा समावेश होता.