<
जगभरासह भारताला वर्षभर छडणाऱ्या कोरोना विषाणूंवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपत्कालीन वापरासाठी लसीला मान्यता मिळाल्यामुळे लवकरच देशभरासह राज्यात लसीकरण राबवण्यात येणार आहे. याची चाचपणी म्हणून यापूर्वी पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली होती त्याच धर्तीवर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्यात शहरी व ग्रामीण भागात लसीकरणाच्या तयारी साठी व यंत्रणेला आत्मविश्वास मिळवण्याच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या टप्प्याची लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली.
यामुळे मोहीम राबवितांना प्रत्यक्ष काय अडचणी येऊ शकतात, को- विन अँपची परिणामकारकता तपासणे, प्रत्यक्ष अंबलबजावणी व कागदावर केलेले नियोजन यातील सुसूत्रता पाहणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
यामध्ये सर्व ठिकाणी 25 जणांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली होती पण प्रत्यक्ष लस टोचण्यात आली नाही. प्रथम अधिकारी लस घेणाऱ्या व्यक्तीची आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्रा वरून ओळख सुनिश्चित करण्यात आली यानंतर सदर लाभार्थ्यांचे द्वितीय अधिकारी को- विन अँपमध्ये नाव नोंद आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात आली. यानंतर व्हॅक्सिनेटर यांनी कोविड बाबत सर्व काळजी घेऊन लसीकरण केले. तृतीय अधिकारी यांनी लस घेतलेल्या व्यक्तीचे अर्धा तास निरीक्षण केले. चतुर्थी अधिकारी यांनी बूथ चे नियोजन बघितले.
जामनेर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय जामनेर व प्रा. आ. कें. शेंदुर्णी येथे रंगीत तालीम घेण्यात आली. तालुक्यात पहिल्या टप्प्यात 1745 नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना 143 प्रशिक्षित लस टोचकाकडून 70 सत्रात ही लस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमशंकर जमादार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोजी चव्हाण, महिला व बालमता बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली खाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनावणे,वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनय सोनवणे, डॉ. हर्षल चांदा, डॉ. राहुल निकम, डॉ.प्रशांत महाजन,डॉ. सागर पाटील, डॉ. शुभम सावळे, डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील यांनी कामकाज केले.
यामुळे प्रत्यक्ष लसीकरण करतांना येणाऱ्या अडचणी टाळता येतील व आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास वाढेल असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले.