<
जळगाव-(प्रतिनिधी) – एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत असुरक्षित ब्राऊन शुगर जप्त केली होती. सदरचा नमुना विश्लेषणाकरीता अन्न् विश्लेषकाकडे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून अहवालानुसार जप्त केलेली शुगर असुरक्षित घोषित केली आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई मा. आयुक्त अभिमन्यु काळे यांच्या आदेशाने अन्न् व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी त्यांना खब-यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार मे. जय गुरुदेव इंडस्ट्रीज अँड वेअर हाऊसिंग, ४७/१-२, वरखेडी रोड, पाचोरा, जि.जळगाव या ठिकाणी दिनांक २९/१२/२०२० रोजी धाड टाकली असता सदरची आस्थापना ही एक्सपोर्ट साठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी तयार करीत असताना आढळले तसेच काही डोमेस्टिक उद्देशासाठी शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी विक्री करीता उत्पादन करीतअसल्याचे आढळले. सदर ठिकाणी तपासणी अंती आस्थापनेत केंद्रीय अन्न सुरक्षा मानके कायदा २००६अंतर्गत परवाना आढळून आला. सदर आस्थापनेत शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरी चे उत्पादन अत्यंत अनारोग्य वातावरणात सुरु असल्याचे आढळले. तसेच शुगर बॉईल्ड कन्फेक्शनरीचे उत्पादनाकरीता वापरण्यात येणारा कच्चा माल “ब्राऊन शुगर” (साखरेचा प्रकार) चे ५० किग्रॅ चे २०० कटटे अत्यंत आस्वच्छ ठिकाणी साठविलेले आढळले. त्यासाठयातून अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी असुमाका अंतर्गत रितसर कच्चा मालातून ब्राऊनशुगरचा नमुना विश्लेषणाकरीता घेवून शिल्लक साठा हा २०० कटटे किंमत रुपये ३,१०,०००/- (तीन लाखदहा हजार मात्र) इतका जप्त केला. सदरचा नमुना विश्लेषणाकरीता अन्न् विश्लेषकाकडे पाठविण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार पदनिर्देशित अधिकारी यांनी सदरचा अहवाल असुरक्षित घोषित केलेला आहे.