<
जळगाव, दि. 10 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनात अनेक सत्याग्रह केले, पण त्यातील मिठाचा किंवा दांडीयात्रा सत्याग्रह विशेष ठरला. महात्मा गांधीजींनी 91 वर्षांपूर्वी 78 लोकांनी मिळून केलेला हा सत्याग्रह आज देखील जगातील दहा मोठ्या सत्याग्रहांमध्ये गणला जातो. 2021 मध्ये या मिठाच्या सत्याग्रहाला 91 वर्ष होत आहेत.
दांडीयात्रेची वैशिष्टये :
दांडी यात्रेसाठी महात्मा गांधी दररोज 12 ते 15 मैल वेगाने चालत असत. दांडी यात्रा समुद्राच्या किनारी मुठभर मीठ उचलून महात्मा गांधीजींनी या सत्याग्रहास सुरूवात केली. त्या मीठाचा लिलाव झाल्यावर 1600 रूपये मूल्य मिठाला मिळाले. सैफी विला येथे महात्मा गांधीजींचा मुक्काम दांडी यात्रेदरम्यान होता, नंतर तेच सैफी विला शासनाने राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केले. दांडी यात्रेत महात्मा गांधीजींना भारतातील 11 नद्यांना पार करावे लागले. मिठाच्या सत्याग्रहात 5 मे 1930 रोजी गांधीजींना अटक झाली. त्यावेळी त्यांनी किमान 52 हजार पत्र, 50 भाषणे व 37 लेख लिहीले. तसेच 6 वेळा राष्ट्राला उद्देशून भाषण केले, 3 मुलाखती दिल्या. मिठाच्या सत्याग्रहामुळे मार्टिन ल्यूथर किंग जूनियर व जेम्स बेवल यांनादेखील प्रेरणा मिळाली.13 एप्रिल ला गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील 20 हजाराहून अधिक सत्याग्रहींनी मीठ कायद्याचे उल्लंघन केले. जूनमहिन्याच्या दूसऱ्या आठवड्यापर्यंत या जिल्ह्यातील जवळजवळ अर्ध्याहून अधिक व्यक्तिंनी सरकारी कार्यालयात राजीनामा दिला. 14 एप्रिल रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना अटक झाली. 16 एप्रिल रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील अटक झाली. संपूर्ण देशात किमान 5 हजाराहून अधिक ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला. मुठभर मिठाने ब्रिटीश शासनाला हादरून सोडण्याची ही एक विभ्रांत योजना गांधीजींनी राबविली व इंग्रजांना भारतातून जाण्यास भाग पाडले.
या सत्याग्रहाच्या शतकी वाटचालीबाबत गांधी रिसर्च फाउंडेशन जळगावतर्फे कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता दांडी यात्रेच्या छायाचित्रांचे प्रदर्शन गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. सदरील प्रदर्शन https://www.gandhifoundation.net/HDM/ या लिंकवर पाहता येऊ शकेल. प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.