<
पाळीची अनियमितता किंवा लठ्ठपणाची तक्रार असलेल्या अनेक मुली तुम्हाला माहित असतील. अंगावर नेहमीपेक्षा अधिक लव असणे किंवा गर्भधारणेत अडथळे येणे किंवा वारंवार गर्भपात होणे अशा तक्रारी घेऊनही अनेक मुली किंवा स्त्रिया दवाखान्यांच्या चकरा मारताना अढळतात. मुख्य गोष्ट म्हणजे बरेचदा अशा केसेसमध्ये विवाह होऊन मुलगी आई बनत नाही हे लक्षात येईपर्यंत वैद्यकीय सल्ला घेतला जात नाही किंवा अनेकदा डॉक्टर काय म्हणतायत, कसला त्रास आहे, नेमकं काय निदान आहे हे ना पेशंटच्या लक्षात येतं ना तिच्या नातेवाईकांच्या. डॉक्टरही, काही प्रॉब्लेम नाही, ह्या गोळ्या घ्या आणि वजन कमी करा एवढाच सल्ला देताना दिसतात. ह्या सगळ्यात जर कोण गोंधळून जात असेल किंवा दुःखी होत असेल तर ती मुलगी किंवा बाई. लग्न आणि मूल ह्याच दोन गोष्टींभोवती आजही जिथे बहुतेक मुली आणि स्त्रियांचं अस्तित्व मर्यादित असतं अशा समाजात ह्या समस्येमुळे बायांचं सर्व आयुष्यच पणाला लागतं. मुली आणि स्त्रियामंध्ये वरील लक्षणांच्या अनुषंगाने नेहमी आढळणा-या एका अजाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्या आजाराचं नाव पीसीओएस.
अलीकडच्या काळात किशोरवयीन मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीची समस्या अधिक प्रमाणात दिसून येत आहे. कालांतराने हीच समस्या पीसीओएस या आजाराचं रूप धारण करण्याची शक्यता असते. पीसीओएस ही अंत:स्त्रावाशी निगडीत अशी स्थिती आहे की, ज्यामध्ये अंड्रोजन या पुरुषांमधील संप्रेरकाचं प्रमाण अधिक होऊ लागतं. अशा परिस्थितीत शरीरातील संप्रेरकांचं संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम बीजकोशातील बीजावर होतो. त्यामुळे बीजोत्सर्जन (बीज परिपक्व होऊन बीजाशयातून बाहेर येणे) आणि मासिक पाळीचं चक्र थांबू शकतं. आधीच्या काळात हा आजार वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळायचा, परंतु अलीकडे किशोरवयीन मुलींमध्येही ही समस्या आढळून येत आहे. पीसीओएस हा सामान्यपणे आढळणारा आजार (डिसऑर्डर) आहे. या आजाराचा प्रभाव मागील 20 वर्षांपासून वाढलेला आहे. जेव्हा मुलीचे एका स्त्रीमध्ये रुपांतर होऊ लागते म्हणजे किशोरवयातून तारुण्यात पदार्पण होऊ लागते, त्यावेळी पीसीओएस ची विविध रूपं किंवा लक्षणं दिसायला सुरुवात होते.
पीसीओएस म्हणजे काय?
पीसीओएस म्हणजे पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम. यालाच पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओवेरियन डीसऑर्डर असंही म्हटलं जातं. हा स्त्रियांना होणारा असा आजार आहे, ज्यामध्ये अंडाशयात गाठ (cyst) येते. या आजाराला ‘मल्टीसिस्टिक ओवेरियन डिजीज’ असंही म्हणतात. शरीरातील संप्रेरकांमध्ये असमतोल निर्माण होणं हे पीसीओएस या आजारामागचे प्रमुख कारण आहे. अनुवंशिक आजारांमुळेही हा आजार होऊ शकतो.
पीसीओएस या आजाराचं निदान विविध प्रकारची लक्षणं ओळखून, शारीरिक तपासणीद्वारे आणि मेडीकल हिस्ट्री(मासिक पाळी अनियमित येते का, वजनात बदल, इ) लक्षात घेऊन, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी आणि रक्ततपासणीद्वारे(अन्ड्रोजन संप्रेराकाचं आणि साखरेचं प्रमाण तपासण्यासाठी) केलं जातं.
पीसीओएस चे परिणाम –
१. पचनसंस्थेवर, चयापचयावर परिणाम होत असतो. त्यामुळे लठ्ठपणा, डायबेटीस, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार उद्भवतात.
२. पीसीओएस चा मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. यामध्ये नैराश्य, चिंता, स्व आदर कमी होणं, असे काही मानसिक पैलू आढळतात.
३. पीसीओएस मुळे गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
४. ज्या स्त्रियांना पीसीओएस हा आजार आहे त्यांना गर्भधारणेनंतर पहिल्या तिमाहीत गर्भपात होण्याची शक्यता असते. यामागे लठ्ठपणा हेदेखील एक कारण असू शकते.
पीसीओएस ची लक्षणे –
१. अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, शरीरावर(छाती, पोट, पाठ, ….) तसेच चेह-यावर अतिरिक्त केसांची वाढ, पुरळ येणे, गरोदरपणात अडचणी येणं अशी प्रजनन संस्थेशी निगडीत लक्षणे आढळतात.
२. बीजकोषावर गाठ किंवा अनेक गाठी येणे.
३. वजन वाढणे किंवा लठ्ठपणा येणे.
४. पुरळ येणे, तेलकट त्वचा किंवा केसांत कोंडा होणे.
५. चयापचयाशी संबंधित काही लक्षणेही आढळतात. उदा. चयापचयाचे आजार, डायबेटीस, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, इ.
पीसीओएस या आजाराची वरील सर्व लक्षणे एकाच वेळी आढळत नाहीत आणि संपूर्ण आयुष्यभरही ही लक्षणे जाणवू शकतात. पीसीओएस ही एक गंभीर परिस्थिती आहे, जी किशोरवयात अनियमित मासिक पाळीच्या रूपातून सुरु होते. साधारणपणे 20 ते 44 या वयातील स्त्रिया या आजाराला सामो-या जात असतात. हा आजार काहीसा चयापचयाशी आणि काहीसा स्त्री रोगाशी संबंधित आजार आहे.
उपचार –
१. पीसीओएस हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण त्याच्यावरील नियंत्रणासाठी उपचार केले जाऊ शकतात. संप्रेरकांचं संतुलन निर्माण करणा-या औषधांच्या मदतीने काही फरक पडू शकतो.
२. नियमित व्यायाम, पुरेसा आणि संतुलित आहार, वजनावर नियंत्रण, असे बदल आपण आपल्या जीवनशैलीत केले तर पीसीओएस ला प्रतिबंध करणे शक्य आहे.
लक्षात ठेवा, हा आजार जरी पूर्ण बारा होऊ शकत नसला तरी त्याच्या लक्षणांवर आणि परिणामावर मर्यादा आणता येतात. आपल्या सारख्या purushapपुरुषप्रधान समाजात गर्भधारणेत निर्माण होणारे अडथळे आणि वारंवार गर्भपात हे परिणाम स्त्रियांसाठी अधिकच काचणारे आणि त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असू शकतात. परंतु योग्य डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि काही जीवनपद्धतीतील बदल, नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या संधी यांनी ह्या गोष्टीवरही मात करता येऊ शकते. तेव्हा ह्या स्थितीला सामोरं जाणा-या मुली, स्त्रिया आणि कुटुंबीय यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की टेक इट इझी …..
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’