<
जळगाव दि. 19 : स्मार्टफोनच्या दुनियेत आजही कॅमेरांचे महत्त्व कमी झाले नाही. वेगवेगळ्या कॅमेरा लेन्सच्या कॅमेरांना व तंत्रज्ञानाची मदत घेऊन फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरांना आजही मानाचे स्थान आहेच. आज जागतिक फोटोग्राफी दिवस जैन इरिगेशनच्या कलाविभागातील सहकाऱ्यांद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी विभागातील सर्व कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले.
कला विभागाचे वरिष्ठ अधिकारी विकास मल्हारा यांच्याहस्ते पूजन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार ईश्वर राणा, मीडिया विभागाचे व्हा. प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थीत होते. तसेच छायाचित्रकार राजेंद्र माळी, राजू हरिमकर, हिमांशू पटेल, योगेश संधानशिव, धर्मेश शहा, तुषार बुंदे, जगदिश चावला, ललित हिवाळे, योगेश सोनार, प्रमोद माळी यांच्यासह अध्यक्षिय कार्यालयातील सहकारी उपस्थित होते. 180 व्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त पेढे वाटप करून शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. 1839 साली फ्रेंच सरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेतले होते. काही वस्तू, प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात. या तत्त्वातून साधारणत: सन 1800 मध्ये कॅमेरा या संकल्पनेची रूजवात झाली. 1839 च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्र कलेचा जन्म झाला. इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा 1990 मध्ये उद्यास आला. पुढे सातत्याने डिजिटल कॅमेऱ्यांमध्ये काळानुरूप परिवर्तन होत गेले. हल्ली छायाचित्रण व्यवसाय नावलौकिकाच्या उंबरठ्यावर आहे. फ्रेंच सरकारने हा दिवस साजरा करण्याचे घोषित केले होते. तेव्हापासून हा जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात येत आहे.