<
जळगाव । २७ मे २०२१ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध १ जून पासून शिथिल होण्याची शक्यता आहे. शासनाच्या नवीन निर्णयांची अंमलबजावणी करताना व्यापारी बांधवांचा विचार करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललीत बरडीया, युसूफ मकरा, अनिल कांकरिया, सचिन चोरडिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख अत्यंत वेगाने खाली येऊन रुग्णांची संख्यादेखील लक्षणीयरीत्या कमी झालेली असल्याने व्यापारी महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील हजारो व्यापारी बांधवांनी पहिल्या प्रदीर्घ लॉकडाऊन नंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेऊन प्रचंड आर्थिक नुकसान सोसले आहे. यातील कितीतरी व्यापारी बांधवांचे मनोधैर्य आर्थिक स्रोत बंद झाल्याने अक्षरशः कोलमडून पडले आलेले आहे. कोणतेही उत्पन्न नसताना कर्मचाऱ्यांचे पगार, बँकांचे हफ्ते, भाडे, लाईटबील, मेंटेनन्स यांचे व्यवस्थापन व नियोजन करावे लागत असल्याने बहुतेक सर्वच व्यापारी बांधव अभूतपूर्व अशा आर्थिक आणीबाणीचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संदर्भात दि. १ जून २०२१ पासून राज्य शासनाकडून नवीन नियम लागू होणार आहेत. आपण जळगाव जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी आहात. पूर्णपणे थांबलेल्या अर्थचक्राची व कोलमडून पडत असलेल्या लहान-मोठ्या व्यापारी बांधवांची परिस्थिती आपल्याला ज्ञात आहे. जिल्हाधिकारी या नात्याने आपल्याला असलेल्या अधिकारांचा जास्तीतजास्त वापर करून थांबलेले अर्थचक्र पुन्हा सुरु होऊन व्यापारी बांधवांना आर्थिक संकटावर मात करता येईल या दृष्टीने कृपया निर्णयाची अंमलबजावणी आपण करावी अशी सर्वांची इच्छा आहे. हजारो व्यापारी बांधवांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. तरी कृपया उपर्युक्त सर्व मुद्यांचा सखोल विचार करून नवीन नियम लागू करतांना थांबलेले अर्थचक्र पूर्ववत सुरु होण्याबाबत व निर्माण झालेली तूट भरून निघण्याच्या अनुषंगाने पाऊले उचलावीत अशी विनंती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना करण्यात आली आहे. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना देखील पाठविण्यात आले आहे.