<
आज देशात तसेच आपल्या अवतीभवती घडणार्या विविध घटनांचा आढावा घेतला की एक प्रश्न मनात येतो हे अपयश नक्की कोणाचे आहे येथील व्यवस्थेचे की शिक्षणाचे? बलात्कार, दरोडे, खून यासह विविध गुन्हे पहिल्यावर यामध्ये अशिक्षित लोकांपेक्षा शिक्षित लोकांची संख्या जास्त आहे. मग त्यांना असे गुन्हे करूच नये असा संस्कार करण्यात कोण अपयशी ठरलं. आई वडील, समाज, व्यवस्था की शिक्षण?. पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्याच्या हाताला आपण काम देऊ शकत नसेल तर तो दोष नक्की कोणाचा दुर्लक्षित शिक्षण पध्दतीचा की व्यवस्थेचा?
सरकारी नोकर, अधिकारी कोणत्याही कामासाठी लोकांकडे लाच मागत आहेत आणि काही समाजाच्या कल्याणासाठी पदरमोड करत आहेत तर एकाच व्यवस्थेतील या दोघांमध्ये असा फरक कसा? याला जबाबदार कोण? ती व्यक्ती की व्यवस्था? आपल्याच शिक्षकाला जेव्हा पोलीस किंवा विविध शासकीय अधिकारी चिरीमिरी मागतात तेव्हा मात्र अंतर्मुख व्हायला होत. याला शिकविण्यात नेमकी माझी चुक काय झाली? मी याला मूल्यशिक्षण देण्यात कमी पडलो की मूल्यशिक्षण फक्त एक पुस्तकाचा भाग बनून राहिला?. कोरोना काळात आमच्याच ज्ञान सागरात डुंबलेले शासकीय अधिकारी दारूच्या दुकानांसमोर रांगा लावण्याची जबाबदारी शिक्षकांना देतात आणि हे काम करण्यास नकार दिला तर सरळ आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. याच रांगेत जेव्हा त्यांचे विद्यार्थी असतात. तेव्हा त्यांच्या मनातील शिक्षक धायमोकलून रडतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो यात बरोबर कोण आहे? मी? अधिकारी? विद्यार्थी? व्यवस्था? की व्यवस्था निर्माण करणारे?
कोरोनाकाळात सगळ्या जगाची भिस्त होती आरोग्य व्यवस्था आणि संशोधकांच्या अभ्यासावर… कारण शिक्षण असे एकच क्षेत्र होते की तेच फक्त जगाला वाचवू शकते. मग यासाठी कितीही कोटी रुपये लागले तरी द्यायची जगातील सर्व देशांची तयारी. इतरवेळी दिसणारा त्यांचा पगार यावेळी मात्र कोणालाही दिसलाच नाही. कारण जो तो फक्त जगण्याचा लढाईसाठी बेड आणि ऑक्सिजन शोधत होता.
जनगणना, निवडणूक, सर्वेक्षण, विविध शासकीय योजना अशी शेकडो शालाबाह्य कामे करत असताना काही वैयक्तिक, घरगुती कारणास्तव एखाद्या कामास नकार दिला किंवा अनुपस्थित राहिल्यास यांच्यावर अमुक अमुक कलमानुसार गुन्हे दाखल करा असे जेव्हा सांगण्यात येते तेव्हा आमचे काम शिकविणे आहे का अन्य काही असा प्रश्न पडतो. मग शिक्षण व्यवस्थेचा अपयशाला शिक्षक जबाबदार कसा? शिक्षक म्हणजे अक्कलेपेक्षा पगार जास्त असलेली जमात. त्यामुळे त्यांनी ही सगळी कामे निमुटपणे केलीच पाहिजे असे ऐकवणारे ही आमचेच विद्यार्थी मग दोष कोणाला द्यायचा?
आज विचारवंत, अभ्यासक, सजग नागरिक यांनी शासन किंवा व्यवस्थेला काही प्रश्न विचारले किंवा सल्ले दिले तर यावर शिव्यांची लाखोली वाहणारे ही त्यांचेच विद्यार्थी मग या समस्येवर कोणत्या न्यायालयात दाद मागणार?
कोरोना काळात सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र म्हणजे शिक्षण. बाराखडी न शिकता एका वर्गातून विद्यार्थी दुसर्या वर्गात गेले. अनेक ठिकाणी शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शिकविण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मंडळींकडे कोठून येणार मोबाईल आणि इंटरनेट… उद्या हीच पिढी बेरोजगार म्हणून पुढे आली तर त्याचे खापर त्याच्यावर फोडून सगळे रिकामे होतील. विद्यार्थी गळती रोखण्यासाठी सरसकट पास करावे असा आग्रह ना कोणत्या शिक्षकाने केला ना कोणत्या पालकांनी मग आज दहावी बारावीच्या मार्कांची सूज येऊन जी बेकारी वाढली ती कोणामुळे?
कोणतीही निवडणूक आजपर्यंत शिक्षणाच्या प्रश्नांवर लढवली गेली ना लढविली जाणार. आणि तसा कोणी प्रयत्न केला तरी जिंकण्याची सुतराम शक्यता नाही.
आज एकट्या शिक्षकाचे मालक किती? शासन, शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक/प्राचार्य, पालक, विद्यार्थी, शिक्षण अधिकारी, इतर शासकीय अधिकारी, समाज आणि त्याचे कुटुंबीय. जवळ जवळ 10 पेक्षा जास्त मालकांच्या अपेक्षांचे ओझे एकटा किती पेलणार. समजा एकच गाडी दहा लोक चालवित असतिल तर नक्की काय होईल याचा विचार करूया? आज जी अवस्था बळीराजाची आहे उद्या ती शिक्षकाची असेल.
काल समाज परिवर्तनात सिंहाचा वाटा शिक्षकांनी उचलला. शिक्षक समाज परिवर्तनाचा दुवा होता. त्याने मांडलेला विचार कोणीही टाळत नसे. मग आज तोच एवढ्या तुच्छतेचा भाग कसा झाला? मग आज कोण बदलले शिक्षक की व्यवस्था?
पहिल्या इयत्तेत खरा तो एकची धर्म आणि भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रार्थना आपण शिकलो मग जाती – धर्माच्या नावाखाली दंगली, देशाच्या विरोधात कारवाया करायला मन धजावते कसे? आपण शिकलो ती प्रार्थना चुकीची? की प्रार्थना शिकवणारी व्यवस्था चुकीची?
शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे व सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी असे म्हणतात केवळ साक्षर होणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर ज्या शिक्षणामुळे स्वावलंबन निर्माण होते, आपला सर्वांगिण विकास होतो, ते खरे शिक्षण.
थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणूनच असे म्हणतात
“विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।”
आजच्या शिक्षणाने आपण साक्षर झालो, नोकरी मिळवली, पैसा आला, पण आपण खरच शिक्षित होऊन आदर्श नागरिक बनलो आहोत काय? आज पीएच.डी, नेट सेट झालेले शिक्षक रोजंदारी, मजुरी, पेट्रोल पंप, हॉटेल मध्ये, रात्र पाळीत वॉचमन म्हणून काम करत असतील. विनाअनुदानित शिक्षणाचा सुळसुळाट असेल तर आम्ही देशात योग्य नागरिक घडवू शकलो नाही याचा जाब कोणाला विचारणार?
(टीप : वरील मतांशी आपण सहमत नसाल तर ते अपयश कोणाचे? याचे उत्तर स्वतः शोधावे. तेवढेच आत्मपरीक्षण करण्याची संधी.)
डॉ. सुभाष कारंडे
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
9921452808
[email protected]