<
अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद; परिचारिकांसाठी बालरोग विभागाचे प्रशिक्षण शिबीर संपन्न
जळगाव : परिचारिका संवर्गाचे प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट आली तरीदेखील त्यात आपला बालरोग विभाग हा उत्तमरित्या सेवा देऊन राज्यात सर्वोत्कृष्ट ठरणार असा विश्वास अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे बालरोग व चिकित्साशास्त्र विभागातर्फे कोरोना महामारीच्या संभाव्य पुढील लाटेत लहान मुलांना असणारा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर पहिला टप्पा म्हणून परिचारिका संवर्गाचे तीन दिवसीय प्रशिक्षण पार पडले. समारोपाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद बोलत होते. यावेळी मंचावर बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे उपस्थित होते. तीन दिवसाच्या प्रशिक्षणाबद्दल अधिपरिचारिका संगीता शिंदे व सौ.नागरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ सुरोशे यांनी तीन दिवसाच्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला. डॉ. जयप्रकाश रामानंद पुढे म्हणाले की, प्रशिक्षण घेतल्यास आपण परिपूर्ण होतो. लहान बालकांवर उपचार करणे म्हणजे नाजूक गोष्ट असते. यावेळी आपण परिचारिका संवर्गातील घटक जर बालरोग विभागामध्ये उत्तम सेवा देऊ तर निश्चितच नातेवाईकांची मन जिंकू. लहान बालके पूर्ण बरी होऊन घरी गेली पाहिजे, यासाठी स्वतःला अद्ययावत ठेवावे असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन व आभार डॉ. शिव जनकवाडे यांनी मानले. शिबिरांमध्ये सुमारे ३०० परिचारिका व परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्रशिक्षण समन्वयक म्हणून डॉ. विश्वा भक्ता, डॉ. नीलांजना गोयल आदींनी काम पाहिले.
शिबिरात डॉक्टरांनी केले मार्गदर्शन
तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये डॉक्टरांनी परिचारिकांना रुग्ण हाताळणे याविषयी प्रशिक्षण दिले. यामध्ये डॉ. अतुल गाजरे यांनी कोरोनाची लक्षणे कशी ओळखावी, त्याची तपासणी याविषयी माहिती दिली. डॉ. गिरीश राणे यांनी एक महिना ते बारा वर्षे वयोगटाच्या बालकांना उपचारपद्धती कोणती व कशी वापरावी, त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करावे यासह रुग्ण व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. संपत मलाड यांनी औषध कधी व कसे द्यावेत, त्याची हाताळणी कशी करावी, डॉ. शिव जनकवाडे यांनी, ऑक्सीजन कसा लावावा व मुलांचा श्वास कमी जास्त होत असल्याबाबत अभ्यासपूर्ण माहिती तर डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी कोविड पश्चात होणारा आजार “मिस”(MIS-C), त्याची लक्षणे, त्याची तपासणी व प्राथमिक उपचार याबाबत सांगितले. नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या इन्चार्ज डॉ. वृषाली सरोदे यांनी ० ते १ महिना वयोगटाच्या नवजात शिशुन्ना कसे हाताळावे, त्यांच्याकडे कसे लक्ष ठेवावे, त्यांचेवर कोणत्या पद्धतीने उपचार करावेत याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणामधून परिचारिका संवर्गांना उपयुक्त माहिती व प्रशिक्षण मिळाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तिसरा लाटेसाठी प्राथमिकदृष्ट्या तयार झाले आहे.