<
सुलज (ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा): शिक्षणक्रांती व Young Army Force, सुलज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून गावातील शेतकऱ्यांसाठी तालुका कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन सभागृह, जगदंबा माता मंदिर, सुलज येथे केले होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिवसा म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, कृषी दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन “भारतीय संविधान” पुस्तिकेला पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे (Preamble) वाचन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कृषी विषयक माहिती अन् मार्गदर्शनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. धीरज वाकोडे (तालुका कृषी अधिकारी), प्रा. अनिल गाभणे (कीटक शास्त्रज्ञ) व प्रा. संजय उमाळे (कृषी विद्या शास्त्रज्ञ), कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद, आमच्या गावातील युवा शेतकऱ्यांसह जवळपास ८० पेक्षा जास्त ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
१) कपाशीवरील किडींचे एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करत असताना अतीशय सोप्या आणि साधन सामुग्रीचे सादरीकरण करून किडीवर कसे नियंत्रण मिळविता येते हे समजून सांगितले; किड नियंत्रणासाठी किडीचे/पिकांचे निरीक्षण करा, लक्षणे ओळखा, लक्षणे दिसली की किती दिवसात व कोणते कीटकनाशक प्रमाणासह फवारणी करावी? याचे सखोल मार्गदर्शनातून प्रतिपादन केले – प्रा. अनिल गाभणे (कीटक शास्त्रज्ञ).
२) खत बचतीच्या उपाय योजना व उत्पादन वाढीचे सूत्र या विषयांवर मार्गदर्शन करत असताना शेतकऱ्याच्या घरातील शेण आणि जनावरांचे मलमुत्र हे खरे सोने चांदी आहे हे सांगताना ज्यांच्या दारी नाही जनावरांचा खुटा, त्यांचा शेतीचा व्यवसाय खोटा या उक्तीप्रमाणे पटवून दिले; शेणखताचा वारंवार वापर करा, रासायनिक व सेंद्रिय खते वापरतांना प्रमाण बद्धता ठेवली कि, खताची बचत आणि उत्पादनाची वाढ करण्यासाठी घरगुती कानमंत्र सांगितले, सोबतच पिक पेरणी पद्धतीतील बदल हे सुद्धा उत्पादनात वाढ करणारे आणि शेत नियोजनात आर्थिक खर्च कमी करण्याचे सूत्र स्व-अनुभवातून सांगितले – प्रा. संजय उमाळे (कृषी विद्या शास्त्रज्ञ)
३) महाराष्ट्र शासनांच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी विषयक योजनांची माहिती व त्यांचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत असताना योजनांची यादी सांगितली अन् त्यावर शेतकऱ्यांशी प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून माहिती देत शंकांचे निरसन केले, त्यासोबतच कृषी विषयक योजनांबाबत कृषी सहाय्यक यांच्या सतत संपर्कात रहा, ते वेळोवेळी सविस्तर माहिती देत असतात, तर कुणालाही कृषी विषयक माहिती हवी असल्यास माझ्याशी प्रत्यक्ष किंवा फोन वरून सुद्धा संपर्क करू शकता, असा विश्वास उपस्थित ग्रामस्थ शेतकऱ्यांना दिला – श्री. धीरज वाकोडे, (तालुका कृषी अधिकारी)
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनंता काटोले यांनी केले तर प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिक्षणक्रांतीचे राज्य समन्वयक प्रा. नितिन घोपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी Young Army Force सुलज च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन पार पाडला.