<
सुलज (ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्राम प्रशासन सुलज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुलजच्या प्रांगणात कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. संपूर्ण जगात गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोणा महामारीने थैमान घातल्यामुळे सर्व स्तरातील जन माणूस त्रस्त झालेला आहे, त्यावर उपाय म्हणून संशोधनातून वेगवेगळ्या कंपनीच्या लसी शोधण्यात आल्या; त्याची अंमलबजावणी करून त्याचा प्रयोगशाळेत व काही रुग्णांवर चाचणी घेण्यात आली, त्यानंतर लसीचे प्रमाणीकरण करून सुरवातीला वय वर्ष ४५ पुढील लोकांना लस देण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला, हळूहळू लसिंची संख्या वाढत गेली त्यामुळे वय वर्ष १८ – ४५ वयोगटातील लोकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली, हे आपणा सर्वांना परिचित आहे.
सुलज येथे घेण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत Covishild आणि Covaxin या दोन लसीचा वापर करण्यात आला. दुसरा डोस असणाऱ्या २२ (पुरुष) व २१ (महिला) अशा ४३ व्यक्तींना Covaxin लसीचा डोस शिबिरात देण्यात आला, तर पहिला डोस घेणाऱ्या ५९ (पुरुष) व ७४ (महिला) अशा एकूण १३३ व्यक्तींना Covishild लसीचा पहिला डोस देण्यात आला.
कोविड १९ लसीकरण शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव काळे येथील डॉ. जीवन भारती यांच्या नेतृत्वात डॉ. राजेंद्र गाठे, डॉ. रेहमत खान, डॉ. रुपाली घोलप (सर्व समुदाय आरोग्य अधिकारी – CHO), श्री. विशाल बनसोड (आरोग्य सेवक), सौ. विद्या रत्नपारखी (आरोग्य सेविका), सौ. सुजाता वाकोडे (आशा स्वयंसेविका, वडगाव) व सुलज येथील सौ. उषाबाई सरोदे (आशा स्वयंसेविका) तसेच शिबिरात नोंदणी प्रक्रिया व सोयी सुविधांची व्यवस्था करून देण्यासाठी श्री. अरुण धोटे व श्री. राम इंगळे इत्यादी प्रत्यक्ष शिबिरात सक्रिय सहकार्य करून जन सेवेत भर घातली. लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, ग्राम प्रशासन सुलज यांनी परिश्रम घेतले.