<
पुणे -(प्रतिनिधी)- दहिहंडी उत्सवात धक्का लागला म्हणून भांडणे सोडविणाऱ्यावर कोयत्याने व तलवारीने वार करण्यात आले होते. यातील तीघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारने जेरबंद केले आहे.
विनायक सुनिल गायकवाड(25,रा.पाषाण), किशोर लक्ष्मण रामावत(24,रा.पाषाण), संकेत राजु जाधव(20,रा.औंध) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी व त्याचा मित्र पाषाण येथे दहिहंडी पहाण्यासाठी गेले होते. यावेळी फिर्यादीच्या मित्राचा संकेत जाधवला धक्का लागला. यावरुन आरोपी व फिर्यादीच्या मित्राची बाचाबाची झाली. यामध्ये फिर्यादीने दखल घेऊन वाद मिटवला होता. मात्र आरोपीने तेव्हा तुला बघुन घेतो असा दम दिला. फिर्यादी व मित्र दोघे घरी जात असताना आरोपी विनायक, किशोर, संकेत हे तीथे आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात कोयता व पाठीत तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीला स्थानीक नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या गुन्हयाचा समांतर तपास युनिट चारचे पथक करत असताना पोलीस कर्मचारी विशाल शिर्के व शंकर संपते यांना आरोपी हे पाषाण येथील हॉटेल अभिमान येते नातेवाईकांची वाट पहात थांबले असून ते तेथून पळून जाणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार घटनास्थळी जावून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यातील विनायक गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याला एकदा तडीपारही करण्यात आले होते. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, निलेशकुमार महाडिक, पोलीस कर्मचारी सुनिल पवार, सचिन ढवळे, विशाल शिर्के, शंकर संपते, गणेश काळे, शंकर पाटील, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.