<
मुंबई -(प्रतिनिधी)-अनुदानाच्या प्रश्नांसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर सोमवारी पोलिसांनी लाठीमार केला त्यात काही शिक्षक जखमी झाले. मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचे गेल्या १४ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. शंभर टक्के अनुदान सह इतर मागण्यासाठी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला. शासनाच्या विरोधात शिक्षकांनी घोषणाबाजी केली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिक्षकांनी मोर्चा नेण्याची तयारी केली असता त्यांना पोलिसांनी अडवले. मात्र शिक्षकांनी न जुमानल्याने लाठीमार सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. आंदोलकांची संख्या वाढत गेल्याने परिस्थिती अधिकच चिघळत गेली. अचानक झालेल्या लाठीमारा मुळे झालेल्या धावपळीत दहा सदस्य जखमी झाल्याची माहिती शिक्षकांनी दिली. यात काशिनाथ पाटील, जळगाव विजय उकत चंद्रपूर, कैलास गिराम, शिंदखेडा राजा, मोतीदास उइखे गोंदिया, काकासाहेब पालखे ह्या शिक्षकाना जबर मारा बसला. तर अनेक महिला शिक्षिका पळापळीमध्ये खाली पडून जखमी झालेल्या आहेत. आझाद मैदानात निर्माण झालेल्या या तणावाच्या परिस्थितीनंतर पोलिस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिक्षकांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाला शिक्षण मंत्री आशिष शेलार त्यांनी भेटायला बोलवण्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला विरोध करत त्यांना आझाद मैदानात बनवण्याची मागणी शिक्षकांनी केली अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने नंतर शिष्टमंडळाने शेलार यांची भेट घेतली. आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळाच्या तीन ते चार बैठका होणार आहेत त्यावेळी निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शेलार यांनी शिष्टमंडळाला दिले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्यात येईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिक्षकांच्या मागण्या : घोषित व अघोषित उच्च शाळांचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात यावा. अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित करा. निवडणुकापूर्वी २० टक्के अनुदानाचा पगार देण्यात यावा.