<
जालना(जिमाका)- महाराष्ट्र राज्यात मराठवाडा विभाग हा अविकसित समजला जातो. आपला मराठवाडा विभाग हा अधिक समृद्ध, सशक्त व सुशिक्षित करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवत मनभेद व मतभेद न बाळगता मराठवाड्याचा विकास अधिक गतीने करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा श्रीमती संगिता गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये, उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली कानडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम पालकमंत्री राजेश टोपे यांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले तर पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून व शोकधुन वाजवुन हुतात्म्यांना मानवंदना दिली.
जनतेला उद्देशुन संदेश देताना पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले,परंतु हैद्राबाद संस्थानातील या मराठवाड्यात त्यावेळी पारतंत्र्य होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी हैद्राबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले. मराठवाड्यातील थोरामोठयांनी या संग्रामात फार मोठी कामगिरी बजावली. मराठवाड्याने शौर्याची परंपरा कायम राखली. तळहातावर जीव घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा देणारी मंडळी आपले घरदार, संपत्ती यांचा तिळमात्र विचार न करता स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सहभागी झाली. सर्वस्तरावर निजामाशी मुकाबला करुन, पारतंत्र्याचे जोखड झुगारुन मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यावेळेच्या क्रांतीकारी पिढीने यशस्वी जबाबदारी पार पाडली म्हणून आज तुम्ही-आम्ही ही स्वातंत्र्याची फळं चाखत असुन या वीरांनी प्रेरणादायी व स्फुर्तीदायी लढा दिला त्यापासुन सर्वांनी बोध घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
आजघडीला मराठवाड्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मराठवाड्याची अर्थव्यवस्था कृषी व कृषीला पुरक व्यवसायावर अवलंबुन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी, वीज, पीककर्ज पुरवठ्याबरोबरच शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याची अधिक गरज असुन मराठवाड्यामध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा, तसेच दरडोई उत्पन्न वाढण्याविण्याबरोबरच उद्योगांच्या माध्यमातुन अधिकाधिक रोजगार निर्मिती होणेही गरजेचे आहे.
आपल्या मराठवाडा विभागाबरोबरच जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास अधिक जलदगतीने होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.