<
वृत्तांकन- युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या २५ जुलै २०२१ रोजी झालेल्या ४४ व्या बैठकीत भारतातील तेलंगणामधील वारंगलजवळील रूद्रेश्वर म्हणजे रामाप्पा मंदिराचा व गुजरात मधील धोलावीराचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाला आहे.
धोलावीरा हे गुजरात मधील चंपानेर रानी की वाव अहमदाबाद यानंतर वारसा स्थळाच्या यादीत समावेश होणारे ४ थे ठिकाण आहे. धोलावीरा शहराचा शोध भारतीय पुरातत्व विभागाने १९६७-६८ मध्ये लावला होता.जगातील सर्वात प्राचिन असणाऱ्या शहरांपैकी हे एक शहर आहे. हडप्पा संस्कृतीचे भारतातील सर्वात मोठे क्षेत्र असलेले शहर म्हणजे धोलावीरा. धोलावीराचे महत्व “धोलावीराचा शोध म्हणजे सिंधू संस्कृतीचे (हडप्पा संस्कृतीचे) पुस्तक उघडण्यासारखे आहे ” या वाक्यावरून लक्षात येतो. हडप्पा संस्कृतीत शहरांची रचना विटांपासून केली जाई, मात्र धोलावीराचे निर्माण कार्य चौकोनी आणि आयताकार दगडांपासून झालेले दिसून येतो.
धोलावीराच्या पुराव्यांवरून या संस्कृतीच्या लोकांना पाणी वाचविण्याचे, पाण्याचे नियोजन करण्याचे तंत्रज्ञान माहीत होते असे दिसते. या शहरातील लोकांनी बंधारे बांधून शहराच्या चारही बाजूस असलेल्या तलावात पाणी संग्रहीत केलेले होते , आणि हे तलाव विहीरीना जोडलेले होते. नदीचे जास्तीचे पाणी तलावात व तलावातून विहीरीत यामुळे पाण्याची गरज सहज भागत असे. हडप्पा संस्कृतीचे मनके बनविण्याचे एक केंद्र, दगडापासून बनवलेली मंगूसची मुर्ती, उत्खननात सापडलेले घोडयाचे अवशेष, हडप्पा संस्कृतीत तीन भागात विभाजीत एक मात्र शहर, उत्खननात हडप्पा संस्कृतीत आजपर्यंत सापडलेले खेळाचे एकमेव मैदान (स्टेडियम) ही सर्व वैशिष्टय धोलावीराला विशेष बनवितात. धोलावीराचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या शहराच्या किल्याच्या महाद्वाराच्या वर एक बोर्ड सापडला आहे. हा जगातील सर्वात जुना नाव असलेला बोर्ड आहे.पण दुदैवांने याचे वाचन कोणालाही करता आले नाही.
या बोर्डावर एकूण १० अक्षरे आहेत. ही अक्षरे आजही सुस्थितीत आहेत जणू काही या महानगरीत प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करत आहेत. ही अक्षरे नगराचे नाव आहे, की एखादया अधिकाऱ्याचे नाव आहे किंवा आजच्या जाहिराती प्रमाणे एखादी जाहिरात आहे हे मात्र आजही लिपी वाचता न आल्यामुळे रहस्य आहे. भारत सरकारने जपान व विश्वस्तरावरील निष्णांत काप्यूंटर तज्ञाच्या मदतीने या ठिकाणच्या महानगरीचे चित्र तयार केले आहे . हे चित्र पाहील्यास आधुनिक काळातील सुसज्ज व महान नगरी आहे असे वाटते. आयुष्यात एकदा तरी धोलावीरा या मनमोहक नगरीला भेट दयावी व प्राचिन भारताचा गौरवशाली इतिहासाचा अनुभव घ्यावा.
लेखन:- श्री.अजय पाटील
एम.ए.डीएड सेट (इतिहास)
(लेखकाचे सिंधू संस्कृती भारतीय इतिहासाचे सोनेरी पान हे पुस्तक अथर्व प्रकाशनाने प्रसिध्द केले असून सदर पुस्तकांची नोंद कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाने (इतिहास विभाग)संदर्भ ग्रंथ म्हणून घेतली आहे.)