<
नाशिक(प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील रस्ते निकृष्ट असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ रस्त्यांची काम पूर्ण करावेत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केले नाही तर संबधित यंत्रणेवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न,नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोलप्लाझा या रस्त्याची दुरावस्था,वाहतुकीची कोंडीच्या उपाययोजनांबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, माजी विधानपरिषद सदस्य जयवंतराव जाधव,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त महानगरआयुक्त के.गोविंदराज, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक व ठाणेचे सचिव अन्शुमली श्रीवास्तव, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नाशिकचे जनरल मॅनेजर एम.के.वाठोरे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता आर.ए.डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिकचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनावणे, ठाणे महामार्ग सुरक्षा पथकाचे,ठाणे पोलीस उपायुक्त वाहतूकचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, टोल नाक्यांची कामे करताना सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा. पावसामुळेदेखील या रस्त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना तात्काळी गती द्यावी. जर १५ ऑक्टोबर पर्यंत नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती झाली नाही तर संबंधितांवर कारवाई करू असा सज्जड दमच मंत्री भुजबळ यांनी दिला. टोल नाक्याच्या अंतर्गत येणाऱ्या रोडची दुरुस्ती झाली नाही तर टोल नाक्यावर देखील कारवाई करण्यात येईल अशी माहिती भुजबळ यांनी दिली.
यावेळी खासदार समीर भुजबळ म्हणाले,मुलुंड टोल नाक्या पासून वाहतूक कोंडी होत आहे. या कार्यक्षेत्रातील रस्ते विकास यंत्रणांनी याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी करावी. जेणेकरून नागरिकांचा जो रोष आहे तो लक्षात येईल.वारंवार खराब होणा-या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे.जेणेकरून वाहतूक विनाअडथळा वाहतुक कोंडीशिवाय सुरळीत सुरू राहील.आगामी दहा वर्षात होणारे रस्ते तसेच या परिसरातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे नियोजनदेखील सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आतापासून करावे जेणेकरून या परिसरातून होणाऱ्या वाहतुकीचे नियोजन सुयोग्यरित्या करता येईल.