<
मालेगाव(उमाका वृत्त सेवा)- तालुक्यातील 3 हजार 963 जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने या साथरोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या 4 महिने वयोगटावरील गाय व म्हैस वर्गातील सर्व निरोगी पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
तालुक्यातील सौंदाणे येथे पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लम्पी त्वचा रोग, लसिकरण व कार्यमोहिम शिबीराचे उद्घाटन मंत्री श्री.भुसे यांनी केले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गर्जे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मयुरा अरबट, डॉ.गांगुर्डे, डॉ.पवार, डॉ.सुर्यवंशी, डॉ.देवरे, डॉ.भागवत यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, या रोगामुळे जनावरांच्या मरतुकीचे प्रमाण नगण्य असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होऊन त्यांची कार्यक्षमता खालावते. काही वेळा बाधित जनावरांचा गर्भपात होत असून प्रजनन क्षमता सुध्दा घटते. या रोगामुळे त्वचा खराब होत असल्याने जनावरे विकृत दिसतात. या रोगाचा प्रसार निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने तसेच चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास, गोचीड, चिलटे यांच्यामुळे होत असल्याने पशुपालकांनी विशेष खबरदारी घेवून तात्काळ उपचारासह लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लम्पी स्किन डिसीज रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून गोट पॉक्स लसीची पुरेशी मात्रा प्राप्त झाली आहे. लसीचे वाटप क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थाना त्याच्या कार्यक्षेत्रातील गायी व म्हशींच्या वर्गातील पशुधन संख्येनुसार वाटप करण्यात यावे. त्यानुसार क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थाना लसीकरणास सुरुवात करण्याच्या सूचना मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या. बाधित क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी गोचिड गोमाशावरील औषधांची फवारणी करण्यास प्राधान्य द्यावे. तालुक्यातील बाधित पशुंच्या तुलनेत लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लसमात्रा कमी पडणार नाही याची खबरदारी घेवून तशी मागणी नोंदविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
लम्पी त्वचा रोगाची माहिती देतांना पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गर्जे म्हणाले, बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2 ते 5 आठवडे एवढा असुन या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातुन पाणी येते. लसिकाग्रंथीना सुज येणे, भरपूर ताप, दुग्ध उत्पादन कमी होते, चारा खाण्याचे व पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्वचेवर हळूहळू 10-50 मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास, इत्यादी भागात येतात. काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, दृष्टी बाधित होते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात. यासाठी सर्व पशुपालकांनी विशेष खबरदारी घेवून वेळीच उपचार करण्याचे आवाहनही डॉ.गर्जे यांनी यावेळी केले.