<
जळगांव(प्रतिनिधी)- शहरातील मेहरूण येथील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती व्हावी या उद्देशाने तुळजाई फाउंडेशनच्या वतीने ११ संगणक भेट म्हणून दिले.
या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे व नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शाम दामू सोनवणे हे होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजाई फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांनी केले.
लाडवंजारी यांनी आपल्या प्रास्ताविकातून तुळजाई संस्थेचा संगणक देण्यामागील उद्देश स्पष्ट केला, भविष्यात विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षित बनायचे असेल तर संगणकाचे ज्ञान हे बालवयातच मिळायला हवे व त्यासाठीच शालेय पातळीवरून संगणक प्रशिक्षण मिळायला हवे असे स्पष्ट केले. शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी तूळजाई फाउंडेशनने दिलेल्या संगणकांचा योग्य उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केला जाईल असे आश्वासन दिले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ.शाम सोनवणे यांनी मेहरूनचे बोर आणि डिजिटल इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमाची आठवण करून देत एकविसाव्या शतकात डिजिटल युगातील मेहरूनची पोर यांनी संगणकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा असे विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले. तुळजाई संस्थेने श्रीराम संस्थेला भेट म्हणून देलेल्या संगणकांचा योग्य उपयोग संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी करावा असे ही आवाहन केले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक, शाळेचे मुख्याध्यापक, स्थानिक नगरसेवक, विविध शासकीय निमशासकीय संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केले. नामदेव वंजारी, सुनील नाईक, सचिन लाडवंजारी, दीपक वाघ, रोहित सुर्यवंशी, रविंद्र पाटील, लोकंसवांद संस्थचे अध्यक्ष शिरीषकुमार तायडे, किरण लाडवंजारी, मनीष चव्हाण, संदीप तांदळे, रमेश लाडवंजारी, तुळजाई संस्थेचे सचिव दिलीप लाडवंजारी, विशाल आंधळे, जितेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.