<
जळगांव(प्रतिनिधी)- गेंदालाल मिल येथील रहिवासी शंकर मधुकर निकम यांचा दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे चुकीच्या उपचारांनी झालेल्या मृत्यूची चौकशी होऊन सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित डॉक्टर व परिचारिका यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी, गुन्हे दाखल करण्यात यावे व निकम कुटुंबियांना न्याय मिळावा
या मागणीसाठी मयत शंकर निकम यांची आई सुमनबाई निकम व पत्नी रेखा निकम या दोन्ही दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पासुन आमरण उपोषणाला बसलेल्या असुन त्यांच्यासोबत मयत शंकर निकम यांची 3 वर्षांची चिमुरडी मुलगी कनक देखील बसलेली होती. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार शंकर निकम यांना चुकीचे उपचार दिले गेले व उपचारात अक्षम्य हलगर्जीपणा करण्यात आला तसेच त्यांचे दोन वेळेस पोस्टमार्टम करण्यात आले हे अत्यंत आक्षेपार्ह व संशयास्पद आहे.
सदर उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मयत शंकर निकम यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केलेली असुन सदर समितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव व काही खाजगी तज्ञ डॉक्टर्स यांचा समावेश राहणार आहे. समिती 8 दिवसात अहवाल सादर करेल व त्या अहवालात जे ही कुणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही व त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी व प्रत्यक्ष चर्चेत जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आश्वासन दिले.
तसेच सदर विषय गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक घेत निकम कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करून न्याय देण्यात येईल असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलकांच्या वतीने छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, मंगल भालेराव, श्रावण अहिरे, संजय निकम, भैय्या निकम, श्रावण सपकाळे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा केली. अमोल कोल्हे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण तूर्त स्थगित करण्यात आलेले आहे. निकम कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास छावा मराठा युवा महासंघातर्फे न्यायालयात दाद मागणार येणार आहे.