<
जळगाव(प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून सुपारीचे व्यसन जडलेल्या ५८ वर्षीय शंकुतलाबाईंच्या मुख कर्करोगावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उठता-बसता सुपारी खाण्याची सवय आणि गेल्या अनेक वर्षांपासून मिसरीने दात घासण्याची सवय असलेल्या शंकुतलाबाईंच्या तोंडात फोड झाला, त्याचे रुपांतर गाठीत झाले. परिणामी गिळण्यास त्रास व्हायला लागला, तोंडात जळजळही होत होती, तात्पुरते घरगुती उपाय करण्यात आले. मात्र तोंड उघडणेही अवघड होवून बसले. ह्यामुळे शंकुतला चव्हाण यांच्या नातेवाईकांनी त्यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी आणले. याठिकाणी कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे यांच्यासह शल्यचिकित्सक डॉ.तनुज पाटील यांनीही रुग्णाची पार्श्वभूमी जाणून घेत तपासणी केली.
याशिवाय ही सर्व लक्षणे मुख कर्करोगाची असू शकतात यासाठी रुग्णालयातील लॅबमधून तुकड्याची तपासणीही करुन घेण्यात आली. तसेच सीटी स्कॅन, सोनोग्राफी आदि चाचण्याही झाल्यात. याद्वारे हा मुख कर्करोगच असल्याचे निदान झाले असून तो चौथ्या स्टेजवर होता, यामुळे रुग्णाच्या जिवीतास देखील मोठा धोका निर्माण झाला होता. तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल असे चव्हाण यांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितले आणि त्यांची संमती घेतल्यावर महात्मा जनआरोग्य योजनेत प्रकरण मंजुरीस टाकण्यात आले आणि मंजुरी मिळताच शस्त्रक्रिया करण्यात आली.
मुखकर्करोगाच्या शस्त्रक्रियेला कमांडो ऑपरेशन असे म्हटले जाते, यात रुग्णाचा जबडा काढून त्याठिकाणी छातीचे मास काढून लावण्यात येते, ह्या प्रक्रियेला सहा ते साडे सहा तासांचा कालावधी लागतो. ही शस्त्रक्रिया सर्जन डॉ.तनुज पाटील, डॉ.विक्रांत वझे यांनी केली असून त्यांना भुलतज्ञ टिममधील डॉ.अग्रवाल, डॉ.शीतल, डॉ.रुतुराज आदिंची सहकार्य लाभले. पंधरा दिवसानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्ण बरा झाल्याने नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
मुखात चट्टे, जखम झाल्यास दुर्लक्ष करु नका शंकुतलाबाईंना सुपारीच्या व्यसनांमुळे कर्करोग झाल मात्र शस्त्रक्रियेने त्या बर्या झाल्यात, मात्र कुठल्याही प्रकारचे व्यसन हे शरिरास घातकच असते. अनेकदा मुखात चट्टा पडतो, फोड येतो किंवा जखम होते, त्यावर तात्पुरते उपचार करुन दुर्लक्ष केले जातात. मात्र असे झाल्यास यात आठ, दहा दिवस वाट न बघता तात्काळ तज्ञांचा सल्ला घेऊन तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन लवकरच आजाराचे निदान होऊन उपचार करता येतात.
डॉ.तनुज पाटील, शल्यचिकित्सक