<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील कवियत्री बहिणाबाई विद्यापिठात २०२२ च्या दिल्ली परेड मध्ये सहभागी होणार्या स्वयंसेवकांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या तज्ञांनी तपासणी करून दिलासा दिला.युवक कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागीय कार्यालय पुणे, आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाची दिल्ली परेड तयारी येथील कवियत्री बहिणाबाई विद्यापिठात सुरु असतांना गेल्या ४ दिवसापासून बदलत्या वातावरणातून अचानक त्रास जाणवायला लागल्याने कुलगुरू माहुलीकरांनी अधिष्ठाता डॉ. एन एस आर्विकर यांना तज्ञ डॉक्टर पाठवण्याची विनंती केली.
डॉ. आर्विकर यांनी डॉ.तेजस कोटेचा, डॉ. साईदिप वाघमारे, डॉ.फैज उस्मानी यांना ताबडतोब विद्यापीठात पाठवले. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, गोवा, गुजराथ, दमण, दीव आणि महाराष्ट्र राज्यातून जवळपास २०० च्या वर स्वयंसेवक येथे तयारीसाठी आलेले होते. शारीरीक श्रम व वातावरणातील बदलामूळे या विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने तज्ञ डॉक्टरांची फौज विद्यापिठात रवाना करण्यात आली होती. या सर्व स्वयंसेवकांची रक्तदाब, इसीजी व इतर तपासणी करून औषधोपचार करण्यात आल्याने दिलासा मिळाला. प्रजासत्ताक दिनाची तयारी करत असलेल्या या स्वयंसेवकांना दोन दिवस वैद्यकिय सेवा प्रदान करत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाने खारीचा वाटा उचलला आहे.