<
मेघना पेठे यांना बहिणाई, अजय कांडर यांना बालकवी ठोमरे तर रफिक सूरज यांना ना. धों. महानोर पुरस्कार जाहीर
जळगाव-(प्रतिनिधी)- मराठी साहित्य क्षेत्रात मानाचे पान ठरलेल्या बहिणाबाई पुरस्कार, बालकवी ठोमरे पुरस्कार आणि ना. धों. महानोर ह्या पुरस्कारांसाठी प्रतिथयश साहित्यिक, कवींची निवड आज करण्यात आली. ‘भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 9 सदस्यीय समितीने जैन हिल्स येथे झालेल्या बैठकीत ही निवड केली.
या बैठकीस विशेष आमंत्रित म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, पद्मश्री ना. धों. महानोर, तसेच निवड समिती सदस्य राजन गवस, डॉ. दिलीप धोंडगे, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, शंभू पाटील हे सदस्य उपस्थित होते. 2018-19 या द्विवार्षिक पुरस्कारासाठी श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि. सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी , जि. कोल्हापूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. जळगावचे कल्याणकारी अंग असलेल्या भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे बहिणाई पुरस्कार, भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. काव्य, कथा, कादंबरी नाटक, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. आतापर्यंत या पुरस्काराचे स्वरूप 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप होते परंतु 2019 पासून या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात येऊन ती एक लाख रुपये अशी करण्यात आली आहे.
साहित्य क्षेत्रातील योगदानाचा सुयोग्य सन्मान – डॉ. भालचंद्र नेमाडे
समाजातील विविध विषयांचा सखोल अभ्यास आणि सूक्ष्म निरीक्षणातून दृष्टीपथास आलेल्या वास्तवाचे दर्शन लेखक आपल्या लेखणीतून समाजाला घडवीत असतात. साहित्यकलेच्या माध्यमातून समाजहित जोपासणार्या सारस्वतांचे ऋण फिटणे तसे अशक्यच, परंतु तरीही समाजहितपयोगी वाङ्मयाची समाजाकडून दखल घेणे गरजेचे वाटते. साहित्यक्षेत्राला अधिकाधिक प्रेरणा, बळकटी व व्याप्त स्वरुप प्राप्त व्हावे त्यांना प्रोत्साहान मिळावे यासाठी भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन व बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे या साहित्य पुरस्काराचे प्रयोजन आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाचा हा सुयोग्य सन्मान असल्याचे डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी सांगितले. या पुरस्कार निवड समितीमध्ये प्रथितयश लेखक, प्राध्यापक यांचा समावेश आहे. लेखकाचे लेखन क्षेत्रातील कर्तृत्व, सृजनशीलता, आलेल्या शिफारसी, निवड समितीची पारदर्शकता या कसोट्यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. साहित्य क्षेत्रात आपले वेगळे वैशिष्ट्य या पुरस्कारांनी जपले आहे.