<
मुंबई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात माता-बालकांच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना सक्षम करून माता-बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्र हा उपक्रम राबविण्यात यावा. आरोग्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी स्थानिक भागातील तरूणांना सहभागी करून आरोग्य मित्र ही संकल्पना राबवावी. त्यांना आरोग्याबाबत विशेष प्रशिक्षण द्यावे व त्या भागातील नागरिकांत आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
विधानभवन येथे ‘माता-बालस्नेही प्राथमिक आरोग्य केंद्रसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील विधीमंडळ सदस्यांशी चर्चा केली. या बैठकीस ठाणे जिल्ह्यातून आमदार रविंद्र फाटक, भिवंडी येथून शांताराम मोरे, उस्मानाबाद येथून कैलास पाटील, औरंगाबाद येथून उदयसिंह राजपुत, नाशिक येथून नरेंद्र दराडे यासह संपर्क या स्वयंसेवी संस्थेच्या विश्वस्त मेधा कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख मृणालिनी जोग उपस्थित होत्या.
उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, ग्रामीण भागातील माता आणि बालकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी तसेच आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचा लाभ होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद सदस्य व या उपक्रमासाठी प्रशिक्षित मुले/मुली यांची याबाबत एकत्रीत बैठक घ्यावी. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संबंधित पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी दीड लाख रूपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
विधीमंडळ सदस्यांनी जिल्हा प्रशासन व प्राथमिक आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केलेल्या गावांमधून आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि तरूणांची माता -बाल स्नेही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वयंसेवक म्हणून निवड करावी. तसेच त्यांना आरोग्य मित्र म्हणून संबोधण्यात यावे. आरोग्यासंदर्भात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी या स्वयंसेवकांना स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सहायाने बालकांचे कुपोषण, महिलांचे आरोग्य, बालक जन्माला आल्यानंतर त्याच्या आहारासंदर्भात घ्यावयाची काळजी यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे, असेही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.