<
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
जळगांव(धर्मेश पालवे):-जिल्ह्यात जळगांव शहर महानगरपालिका तर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचरा संकलन करण्यासाठी शहरात प्रत्येक प्रभागात घंटा गाडी सुरू केल्या आहेत.शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलन करून त्याची विल्हेवाट लावली जाते.शहरातील काही प्रभागातून स्वछतेच्या नावाखाली मक्तेदारांनी पैसे व वेळ खर्च केला असल्याचं मागच्या महिन्यात उघड झाले असून काही ठिकाणचे व्हिडीओ चित्रण ही प्रसारित झाले आहेत.विविध माध्यमातून होणाऱ्या नकारात्मक बातम्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला ग्रहण लागले असताना,मा.आ.सुरेश भोळे आणि महापौर सीमा भोळे यांनी कालच सर्व विभागांना सूचना करत धारेवर घेतले होते.महानगरपालिका जळगांव च्या घनकचरा व्यवस्थापन विभाग मार्फत आज अचानक प्रभात चौकात घनकचरा संकलन करताना दिसले.एकदम २० गाड्या २५ ते३० कर्मचारी सह एकाच वेळी दाखल झाले होते.येथील संकलन स्थळी जळगांव येथील सामजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांच्याजवळ गाडीवाले व कचरा संकलकानी आपली कैफियत मांडली, आम्हाला आमचा पगार माहीत नसून,कोणाच्या हाताखाली काम करतो हे आम्हाला माहीत नसून गेल्या महिन्या भरापासून काम करत आहोत. त्याच बरोबर आरोग्य सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना आम्हाला दिल्या नसून रोज घाणीत काम करावे लागते, व गाडी खाली करताना हाताने कचरा खाली करावा लागत असल्याचे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. येथील परिस्थिती पाहता महानगरपालिका आपल्या घनकचरा व्यवस्थापन विभागा मार्फत सुरू केलेल्या कामांत कर्मचारी सुरक्षा व आरोग्य करिता दुर्लक्ष करत आहे, असे दिसते. ज्या ठिकाणी प्रभागात फिरून कचरा जमा केला जातो तो ओला व कोरडा असा विभागून जमा केला जातो मात्र हा विभागलेला कचरा मुख्य संकलन ठिकाणी एकत्रच गोळा केला जातो असे चित्र आहे. मनपाच्या भोंगळ कारभाराकडे एकदा पुन्हा बोट दाखवले जात असल्याचं समोर आलं आहे, प्रशासनाला जाग येईल का? कर्मचारी कडे माणूस म्हणून पाहिले जाईल का?आणि जळगाव मधील जनतेला प्रामाणिक सेवा बजावण्यास मनपा सहयोग करेल काय? असे प्रश्न या प्रकाराने उपस्थित होत आहेत.