<
परीक्षेत चांगले गूण देण्याच्या बदल्यात विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या प्राध्यापकाची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या हायप्रोफाईल प्रकरणात अजून ४ प्राध्यापकांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आफ्रिकन देश मोरोक्को येथील न्यायालयाने एका प्राध्यापकाला असभ्य वर्तन, लैंगिक छळ आणि हिंसाचार याप्रकरणी दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हसन युनिव्हर्सिटीशी संबंधित ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील गप्पा सोशल मीडियावर लीक झाल्या. यानंतर देशभरात खळबळ उडाली.
मुलीकडून ‘चॅट लीक’
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील गप्पा सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं होतं. विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने या गप्पा सार्वजनिक केल्या. हळूहळू हे प्रकरण पसरलं आणि ही बाब विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचली. यानंतर प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरण न्यायालयात गेलं. यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत.
5 प्राध्यापकांचा पर्दाफाश
बीबीसीच्या अहवालानुसार, मोरोक्कोमधील विद्यापीठांमध्ये हाय-प्रोफाईल सेक्सच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हा पहिला निर्णय आहे. हसन विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला आपल्या विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. प्राध्यापक विद्यार्थिनींना चांगले गुण देण्याच्या बहाण्याने त्रास देत होता. या प्रकरणी अजून ४ प्राध्यापक न्यायालयात हजर राहिले आहेत. चांगल्या मार्कांच्या बदल्यात मुलींना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप विद्यापीठातील एकूण पाच प्राध्यापकांवर आहे.