<
नेहरू युवा केंद्रातर्फे ‘कॅच द रेन’वर वेबिनार संपन्न, युवकांना केले आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । आज आपल्याला पाण्याचे महत्व मी सांगणे गरजेचे नाही. देशात आणि जगात पाण्यामुळे होत असलेले वाद मी सांगणार नाही परंतु सुजलाम, सुफलाम असलेल्या माझ्या खान्देश, शेतकरी, तरुण, रोजगार, उद्योग आणि जीडीपीला पाण्याच्या दुर्भिक्षाचा कसा फटका बसतो आहे हे आपण पाहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने हाती घेतलेल्या ‘कॅच द रेन’ उपक्रमात आपले योगदान देण्यासाठी आपण सर्वांनी स्वतः जलसाक्षर, पर्यावरण साक्षर होऊन इतरांना देखील साक्षर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेष पाटील यांनी केले.
नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘कॅच द रेन’ उपक्रमाचे महत्व युवकांना पटवून देण्यासाठी रविवारी ऑनलाईन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषण देताना खा.उन्मेष पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी ‘कॅच द रेन’ विषयाबद्दल सविस्तर माहिती देत स्वयंसेवक जिल्ह्यात करीत असलेल्या जनजागृतीबाबत सांगितले. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे लेखाकार अजिंक्य गवळी, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, रोटरीचे माजी प्रांतपाल समकित छाजेड आदी उपस्थित होते. योगी संस्थेच्या अक्षता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गिरीश पाटील यांनी मानले.
खा.उन्मेष पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, जलशक्ती मंत्रालयाने हाती घेतलेला ‘कॅच द रेन’ उपक्रम राबविण्यासाठी पाण्यासाठी काम करणाऱ्या नेहरू युवा केंद्राला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यातील नद्या एकेकाळी १२ माही वाहत होत्या परंतु जल, जंगल, जमीन यांचा समतोल न राखला गेल्याने त्या आज १२ दिवसच वाहतात. जैवविविधता, निसर्गाचे चक्र आज विस्कळीत झाले आहे. आपण पाण्याचे नैसर्गिक स्रोत जीवित ठेवल्यास शाश्वत जीवन आपल्याला जगता येईल. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग केवळ शहरात नव्हे तर ग्रामीण भागात होणे देखील आवश्यक आहे. एकीकडे वृक्ष लागवड करताना दुसरीकडे पाणी अडविणे देखील गरजेचे आहे. छतावरील पाणी जिरवण्याचे आणि भूगर्भातील पाणी वाचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ज्या क्षणी पाऊस पडेल तेव्हा तो अडवायचा आणि जिरवायचा असेल तर त्यासाठी अगोदर नियोजन करावे लागेल, असे ते म्हणाले.
खा.उन्मेष पाटील म्हणाले, पावसाचे पाणी वाचविण्यासाठी आता आपल्याकडे ४ महिने असून आतापासून नियोजन केल्यास जूनमध्ये पाणी अडविणे शक्य होईल. दरवर्षी पडणाऱ्या २० – २५ तासाच्या पावसात ३६५ दिवसाचे नियोजन करून पावसाचा एक-एक थेंब वाचवणे आवश्यक आहे. पाण्याचे नियोजन असेल तर उद्योग येतील, रोजगार मिळेल, आर्थिक चक्रे फिरतील. पाऊस केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर जीवन चक्रासाठीच आवश्यक आहे. आपण स्वतः जलसाक्षर, पर्यावरण साक्षर होऊन इतरांना साक्षर करावे लागेल. जलशक्ती अभियान हे त्यासाठी उत्तम माध्यम आहे. सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, लोक प्रतिनिधी या उपक्रमात एकत्र येतील. जोपर्यंत सज्जन शक्ती एकत्र येत नाही तोवर आपण बलाढ्य राष्ट्र घडवू शकत नाही. आपल्या जिल्ह्याला खूप चांगली भौगोलिक स्थिती लाभली आहे. नदी पुनरुज्जीवनसाठी आपण योगदान देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाणी संवर्धन आणि वृक्ष लागवडहा हेतू साध्य करण्यासाठी बांबू लागवड करावी आणि त्यासाठी पोकरा योजना, बांबू लागवड, मनरेगा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा.पाटील यांनी केले.
खा.उन्मेष पाटील यांनी, रासायनिक शेती ऐवजी जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय शेतीचा प्रयोग करा. भूगर्भात, शेतात पाणी अडवायचे असेल तर ते सेंद्रिय शेतीत जाणे आवश्यक आहे. रासायनिक शेती पाणी अधिक शोषून घेत जमिनीला कडक बनवते. आपण सर्वांनी तहानलेल्या भागाचे दुःख समजून घेत पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा, असे खा.पाटील यांनी आवाहन केले. गिरणा परिक्रमेच्या माध्यमातून आपण नदी पुनरुज्जीवन करण्याचे कार्य सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून हाती घेतलेला कॅच द रेन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली आहे. कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी त्या कामाचा प्लॅन अगोदर मनात तयार व्हायला हवा. नेहरू युवा केंद्राने हा प्लॅन तयार करण्याचे काम केले, असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यात यशस्वी होऊ असा विश्वास खा.उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक तेजस पाटील, रोहन अवचारे, माजी युवा स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, चेतन वाणी, आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी, योगी संस्थेचे प्रणिलसिंग चौधरी आदींसह इतरांनी परिश्रम घेतले.