<
“माय म्हणे मायले बठ्ठा लेकरे प्यारा ।
पन तिज म्हणे एक हातना बोटे न्यारान्यारा”
आई आणि मुलांमधील नाते स्पष्ट करणारी ही अहिराणी कविता कवी डॉ. वाल्मीक अहिरे यांनी सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. त्याचप्रमाणे
“मन भिरभिरं नजर सैरभैर ।
सजनी तू क्षितिजा दूर”
या त्यांच्या प्रेमकवितेने तरुण विद्यार्थ्यांमध्ये उत्साहात संचारला. निमित्त होते सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित कविसंमेलनाचे. ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’निमित्त मराठी विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा – भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. वाल्मीक अहिरे यांनी या कविता सादर केल्या.
अमरावती येथील कवी डॉ. स्वप्निल देशमुख यांच्या सामाजिक कवितेने श्रोत्यांना विचार करायला भाग पाडले. ते आपल्या कवितेमध्ये म्हणतात,
“समाजातील विदारक वास्तव पाहतो मी,
हृदयाला पेटविणारा विस्तव पाहतो मी ।
मन माझे व्याकुळ होते जेव्हा जेव्हा कविता असते,
सोबतीला एकांतात राहतो मी ।”
समाजातील आपल्या आजूबाजूचे दुःख पाहून व्याकूळ होणाऱ्या कोणत्याही संवेदनशील माणसाला ही कविता भावून जाते. यवतमाळ येथील कवी प्रा. ज्ञानेश्वर गटकर आपल्या अस्तित्वाविषयीची जाणीव व्यक्त करणारी कविता सादर केली.
“एक एक श्वास…
ओल्या चिमटीत
मिठासारखा विरघळून जातोय
हुकवून जातोय… जगण्याला…
जागत्या श्वासाला
खडीसाखरेचे गोडपणा आणायचे कोठून
मी श्वास उधार घेतलेत…
मी श्वास उधार घेतलेत…”
खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या “जगणं-मरणं दोन श्वासाचं अंतर” या कवितेची आठवण करून देणारी ही कविता भाव खाऊन गेली.
धुळे येथील युवा कवी प्रवीण पवार यांनी जागतिकीरणातील माणसाची होत जाणारी होरपळ आपल्या कवितेतून अधोरेखित केली.
“गुगलच्या
बांधावर बसून
तुम्हाला खरच कळतंय का
आमचं शेती मातीतलं दुःख
विविध वेबसाईटवर जाऊन कृत्रिम अनुभवात तुम्ही जास्त रमणार नाही
पण एक सांगतो तुम्हाला भाकर डाऊनलोड करणं जमणार नाही… !”
जग कितीही आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध झाले तरी शेतीतल्या आणि काळ्या मातीतल्या माणसाचं दुःख हे अघोरी जागतिकीकरण समजून घेण्यास तयार नाही. हेच दुःख कवी प्रवीण पवार यांनी आपल्या या कवितेतून श्रोत्यांपुढे मांडलं.
मूर्तिजापूर येथील युवा कवी श्रीकांत राऊत यांनी सादर केलेल्या कवितेतून व्यवस्थेविरुद्ध भाष्य केले.
“तरीही लाचारीकडे प्रस्थान करवणारे
पूल उध्वस्त केलेच पाहिजेत
निद्रिस्त व्यवस्थेच्या कानाजवळ शंखनाद केलाच पाहिजे…
बाहुतील बळावरच अवलंबून नसतो
पुरुषार्थाचा सिद्धांत”
अशाप्रकारची सशक्त शब्दकळा असलेली कविता आहे. त्यातून त्याने क्रांतीचा जयजयकार केला आहे. मलकापूर येथील विद्यार्थी कवी सौरभ हिवराळे याने माणसातील खोट्या संवेदनशीलतेचा बुरखा टराटरा फाडणारी कविता सादर केली. तो आपल्या कवितेत म्हणतो,
“दर्ग्यावरच्या अत्तराला,
तिथं हलाल झालेल्या
बोकडांच्या रक्ताचा वास…
मन्नतचे धागे पाहून,
काय मागायला आलो होतो,
विसरलो !
मागून आलो
कुणाचीच मनात कधी
अधुरी न राहो…”
अशाप्रकारे उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनातील कवितांना महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली.
प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. त्यांनीही यावेळी आपली आवडती वऱ्हाडी प्रेमकविता सादर केली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.अतुल देशमुख यांनी केले तर डॉ. बी. एस. भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.