<
जळगांव-(चेतन निंबोळकर)- लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला दर्पण म्हणतो, त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लोकशाहीचा व कर्तव्याचा हल्ली विसर पडल्यासारखं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे एक पाऊल जनतेच्या हितासाठी, अशी शपथ घेतलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आपण कशा प्रकारची पत्रकारिता, कशाप्रकारचे कर्तव्य बजावतोय, याचाच जणू विसर पडला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला देशात एक वेगळे स्थान आहे. त्याची एक वेगळीच ओळख आहे. ती ओळख निर्माण झाली ती त्याच्या कर्तव्यामुळे, तो त्या क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे, लोकशाहीचा अर्थ आरसा, दर्पण. त्याच्याकडे पाहिलं की अन्याय झालेल्याला न्याय नक्कीच मिळणार आहे याचं समाधान असतं. त्याला मिळणारे समाधान हे पत्रकारितेत कार्यरत असलेल्या स्वच्छ पाण्याप्रमाणे, पारदर्शी कर्तव्य करणा-या पत्रकाराकडून मिळते. पण हल्ली तोतया पत्रकारांमुळे पत्रकारीतेची व्याख्या काही वेगळी झाली आहे, हा खरंच चिंतन करण्याचा विषय आहे. ज्या गोष्टी समाजाला पत्रकारांकडून अपेक्षित आहेत. त्या गोष्टी न होता पत्रकारितेतून भलतीकडे अशी व्याख्या बनली आहे. पत्रकारिता हा व्यवसाय बनत चालला असल्यामुळे ही चिंतनाची बाब तर आहेच. शिवाय याकडे गंभीरतेने हे पाहिलं पाहिजे. सत्याची कास धरून चालणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ हल्ली तोतया पत्रकारांमुळे ढासळत चालला आहे. तत्त्वांच्या चौकटीमध्ये काम करणं ही खरंच तारेवरची कसरत. ज्यांना ज्यांना ही कसरत जमली तो खरा लोकशाहीचा आधार ठरलाय. देशातील अवैध धंदे, गुन्हेगारी वृत्ती, भ्रष्ट व्यवस्था यांच्याविरुद्ध लढणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार. हल्ली तोतया पत्रकार देखील बनावट ओळखपत्र बनवून आपण स्वत: पत्रकार असल्याचे भासवून जनतेला आणि प्रशासकीय अधिकार्यांची दिशाभूल करुन पैसे उकळताना दिसत आहे. सोशल मीडियावर काम करणा-या व्यक्ती या पत्रकार होऊच कशा शकतात. याचा विचार नक्कीच केला पाहिजे. सोशल मीडियावर एखादी व्हीडिओ क्लिप तयार करून त्याचा प्रसार करणे म्हणजे पत्रकारिता करणे नव्हे. एखादा व्यक्ती समाजामध्ये वाईट काम करत असेल व त्याची वाह वाह करण्यासाठी अशा प्रकारचा बनाव करून जनतेची दिशाभूल व फसवणूक करणारा तो लोकशाहीचा चौथा स्तंभ मुळीच नाही. लोकशाही ने पत्रकारांसाठी आखून दिलेली चौकट माहिती नाही, तो स्वत: रिपोर्टर असल्याचा बनाव करून सर्वसामान्य जनतेला फसवण्याचा धंदा व त्यांची दिशाभूल करण्याचे षडयंत्र काही तोतया पत्रकार करत असताना दिसतात. यामुळे समाजाची सत्य परिस्थिती मांडणारे पत्रकारांना मांजर आडवे गेल्याची चित्र या तोतया पत्रकारांमुळे दिसत आहे. या तोतया पत्रकारांच्या विरोधात कोणीतरी ठोस पावले उचलत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यांच्याकडे कायदेशीर परवानगी आहे का नाही? याचीही पडताळणी व्हायला हवी व त्यापासून होणारा गैरवापर, जनतेची दिशाभूल थांबवायला हवी.समाजामध्ये काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो, तो पैसा आपल्याला कसा मिळेल याकडे अनेक तोतयांचा कल असणारे काहीजण पत्रकारितेच्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासण्याचे काम करत आहे. अशा वृत्तीच्या लोकांनी रचलेले षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. हे ज्याला जमलं, तो खरा पत्रकार!
पत्रकारितेचा “प” माहिती नसणारे पत्रकार ओळखपत्र दाखवून गैरप्रकार करतात. तोतया पोलीस असो वा पत्रकार, अशा अपप्रवृत्ती समाजात बोकाळता कामा नयेत. पत्रकारितेसारख्या व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्तींमुळे संपूर्ण पत्रकारितेला गालबोट लागते.काहींना पत्रकारितेचा गंध नाही. पोलिसांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदांना काही जण हजेरी लावतात. तसेच तोतया पत्रकार माहिती अधिकारात माहिती मागवण्याची धमकी देऊन काही कथित पत्रकार पैसे उकळतात. त्यामुळे अशा तोतयांची चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच असे तोतया पत्रकार अवैधधंदा व्यवसायिका सोबत आर्थिक देवाणघेवाण करत असतात. यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या पत्रकारांना अडचणी निर्माण होत आहे. या बोगस पत्रकारांमुळे पत्रकारीतेची व्याख्या बदलुन समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, या बोगस पत्रकारांवर लवकर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त आहे.