<
जळगाव- पाणी जास्त पडले तर ओला दुष्काळ आणि कमी पडले तर कोरडा दुष्काळ या बिघडलेल्या निसर्गचक्रासोबच नियोजनाअभावी शुद्ध पाणी पुरवठा नागरिकांना होत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे नळांवर भांडणे होत असून एकप्रकारे सामाजिक अशांतता पसरते आहे. यातुनच संभाव्य तिसरे महायुद्ध होऊ शकते असे तज्ज्ञ म्हणतात. हे टाळायचे असेल तर पाणी बचतीविषयी प्रत्येकाने आजच सजग होऊन कृतिशिल आचरण केले पाहिजे असे आवाहन एन. एम. पाटील यांनी केले.
पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय येथे आज भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंरक्षण अभियाना’अंतर्गत पोस्टर्स प्रदर्शन भरविण्यात आले. उद्घाटनप्रसंगी एन. एम. पाटील बोलत होते. या प्रसंगी राजू बाविस्कर, जगदीश बियाणी, सुनंदा वाघमारे, रत्ना बागुल, रंजना चौधरी, जैन इरिगेशनचे ज्ञानेश्वर शेंडे, आनंद पाटील, राजू हरिमकर उपस्थीत होते.
पुढे बोलताना पी. एम. पाटील म्हणाले की, पाण्याचे महत्त्व प्रत्येकाने जाणून जलसंवर्धनासाठी कार्य केले पाहिजे. माझे घर, कुटुंब, नातेवाईक एव्हढ्यापुरता विचार न करता सामाजिक बांधिलकीतून पाणी वापर केला पाहिजे. मला मिळालेले शुद्ध पाणी समाजातील प्रत्येक घटकाला कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, वृक्षदिंडी, निबंध स्पर्धांद्वारे अभिव्यक्त होण्यासाठी पोस्टर प्रदर्शनाचा अभ्यास करून पाणी बचतीसाठी काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे असे मार्गदर्शन पी. एम. पाटील यांनी केले.
पाणी बचती महत्त्व सांगताना ज्ञानेश्वर शेंडे यांनी विद्यार्थ्यांना मानवी वर्तनातून प्रदूषीत होणाऱ्या नद्या, जलसाठ्यांची माहिती दिली. पाण्याला स्वत:चा नाद असतो. पावसाचा आवाज, जलतरंगाचा आवाज हा वेगवेगळा येत असून तो ऐकण्यासाठी संवेदनशील मन असलेला माणसासारखे आपण जगले पाहिजे त्याच्याकडे त्यादृष्टीने पाहिले पाहिजे. यासाठी जल बचतीकडे विज्ञाननिष्ठेतेने प्रयत्न करावे कारण पाण्यावरच सजीवांचे अस्तित्व आहे, असे ज्ञानेश्वर शेंडे म्हणाले. आनंद पाटील यांनी प्रदर्शनामागील भूमिका स्पष्ट करताना भविष्याच्या दृष्टीने पाणी बचतीचे विविध मार्ग सांगितले. जल प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचा संकल्प यावेळी केला. सुत्रसंचालन जगदीश बियाणी यांनी केले. यशस्वीतेसाठी पी. एम. मुंदडे विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.