<
जळगाव (प्रतिनिधी) : विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन. अशा पवित्र बंधनात कुणालाही दुर्धर व्याधी येऊ नये, असेच सर्वांना वाटते. विवाहपूर्व अनेकांना दुर्धर व अनुवांशिक आजार असतात, हेच माहित नसते. मात्र ज्यावेळी लक्षणे दिसतात व त्रास होतो तेव्हाच लक्षात येते. त्यामुळे जोडीदाराला देखील त्या व्याधी होऊ शकतात. म्हणून विवाहपूर्व आरोग्य तपासणी करण्याचे महत्वपूर्ण आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगावने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या संयुक्त विद्यमाने केले आहे.
“विवाह” हे पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. विवाह जुळवताना वधू-वरांची सर्व माहिती काढली जाते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे कुंडली देखील काढली जाते. वर-वधू एकमेकांना पूरक असले व त्यांचा स्वभाव जुळत असला आणि ज्योतिषशास्त्रीय कुंडली नाही जुळली तर मात्र वधू-वरांच्या मनांचं विचार न करता विवाह रद्द केला जातो. अशा जाचक रूढीविरुद्ध २०० वर्षांपासून राज्यातील समाजसुधारकांनी आवाज उठवून ज्योतिषशास्त्रीय कुंडलीला विरोध केला आहे. याऐवजी आरोग्य कुंडलीला प्राधान्य देऊन भविष्यात होणाऱ्या व्याधींविषयी दक्ष राहण्याचे आवाहन महाराष्ट्र अंनिसने केले आहे.
वैवाहिक नाते सुखी व समृद्ध ठेवण्यासाठी एकमेकांतील सुसंवाद जसा महत्वाचा आहे, तसेच विवाहपूर्व आरोग्य तपासणी करून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. विवाहपूर्व आरोग्य तपासणीत सिकलसेल, थॅलेसेमिया, एचआयव्ही, हेपेटायटिस बी या तपासण्या सरकारी फी मध्ये नाममात्र दरात केल्या जाणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अनुकूलता दर्शवली आहे. ओपीडी काळात सकाळी ९ ते १ या वेळेत विवाहपूर्व आरोग्य तपासणी करून मिळणार आहे. याकरिता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर सहकार्य करीत आहे. तपासणीकरिता जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी (९२८४४९७७०५), समाजसेवा अधिक्षक संदीप बागुल (९८२३८७६३६४) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस.कट्यारे, शहराध्यक्ष प्रा. दिलीप भारंबे यांनी केले आहे.
आजाराची माहिती :
थॅलेसेमिया : वंशपरंपरेने किंवा अनुवांशिकतेने जनुकांद्वारे मात्या- पित्याकडून आपल्याला अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात. यांचे एका पिढीतून पुढच्या पिढीत वहन होत असते. बीटा थॅलेसेमिया व्याधीत १ बीटा थॅलेसेमिया जनूक आई किंवा वडिलांकडून अपत्यात येते व काही वेळा दोघांकडून १/१ जनूक येते. परिणामी होणाऱ्या बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते. थॅलेसेमयिा बीटा मेजर ही व्याधी रुग्णालाच नाही, तर कुटुंबियांनाही थकविणारी असते.
सिकलसेल : ही एका पिढीतून पुढच्या पिढीत जाणारी रक्तव्याधी आहे. जिच्यात हिमोग्लोबिनचा बदल दिसून येतो.
एचआयव्ही – हा विषाणू सामान्यपणे, लैंगिक संबंधातून शरीरातील द्रव्यांच्या आदानप्रदानद्वारे, संक्रमित सुईद्वारे रक्तामार्फत किंवा एखाद्या संक्रमित गरोदर आईकडून बाळाला होऊ शकतो. हा विषाणू रोगप्रतिकारक शक्तीला बाधित करतो.
हेपेटायटिस बी : यकृत बिघडण्याचे सर्वाधिक दिसून येणारे कारण म्हणजे, ‘हेपाटायटिस बी’. या हेपाटायटिसचा विषाणू बऱ्याच प्रकारे शरीरात प्रवेश करू शकतो. स्त्रियांना गरोदरपणात या आजाराने ग्रासल्यास अर्भकालाही प्रसूतीच्या काळात ‘हिपाटायटिस बी’चा संसर्ग होऊ शकतो.