<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) – दि.17- खरीप हंगाम, 2022 यशस्वी करण्यासाठी स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव कार्यक्रमातर्गत दिनांक 25 जुन ते 1 जुलै, 2022 या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषि संजिवनी मोहिमेची सांगता दिनांक 1 जुलै, 2022 रोजी मा. स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिन संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो या दिवशी होणार आहे.
सदर कालावधीत हा खरीप पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत या मोहिमेव्दारे कृषि विभागाचे अधिकारी, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत जावुन नविन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतकऱ्यांनी सदर तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न करणार आहे. संपुर्ण राज्यातुन एकाच दिवशी एकाच मोहिमेची प्रचार प्रसिध्दी करण्यात यावी या करीता खालील नमुद केल्याप्रमाणे प्रत्येक दिवशीचे नियोजन करण्यात आले आहे.
दिनांक 25 जुन, 2022 रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन, दिनांक 26 जुन, 2022 पोष्टिक तृणधान्य दिवस, 27 जुन, 2022 महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, दिनांक 28 जून, 2022 खत बचत दिन, 29 जुन, 2022 प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस, 30 जुन, 2022 शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस, दिनांक 1, जुलै, 2022 कृषि दिन
सदर मोहिमे अंतर्गत गाव बैठका, शिवार भेटीचे व शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार असुन शेतकऱ्यासोबत गावात कृषि विषयक राबविलेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार आहे. तसेच मोहिम कालावधीत दररोज ऑनलाईन चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्याने इत्यादी आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यानी मोहिमेत सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.