<
जळगाव-(प्रतिनिधी) – गिरणा धरण व बहुळा-दहिगाव प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी कांताई बंधारा ओसंडून वाहतो आहे, यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.
पाणी म्हणजे ‘जीवन’. जीवनमान उंचाविण्याचे माध्यम. पाण्याचे शाश्वत स्त्रोत ग्रामीणस्तरावर निर्माण व्हावे, यासाठी श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीने कांताई बंधाऱ्याची निर्मिती झाली. सुमारे पाच किलोमीटर परिघातील गावांमधील हजारो लोकांचा जीवनस्तर उंचावण्याचे प्रभावी माध्यम कांताई बंधारा ठरत आहे. विहिरी, बोअरवेल यांना पाझर फुटून भूजलस्तर वाढला आहे. शेत-शिवार फुलले आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन गावांमधील स्थलांतर थांबण्याबरोबरच या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी कांताई बंधारा मुख्य जलस्त्रोत ठरत आहे.
पाणी टंचाईचे संभाव्य धोके टाळण्यासाठी नद्यांवर जागोजागी बंधारे बांधून पाणी अडविण्याशिवाय पर्याय नाही हे मोठ्याभाऊंनी जाणले. जळगावला लागूनच गिरणा नदी वाहते, मात्र नियोजनच्या अभावामुळे या परिसरात आधी पाण्याचे दुर्भिक्ष होते. पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावेत; यासाठी जळगाव तालुक्यातील धानोरा आणि कढोली परिसरात बंधारा बांधण्याचे डॉ. भवरलालजी जैन यांनी निश्चित केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. च्या आर्थिक सहयोगाने तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत यासंदर्भात शासनाशी करार करण्यात आला. झालेल्या करारानुसार परिसरातील अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. जीवनदायी गिरणा नदी
कांताई बंधारा हा गिरणा धरणापासून १४० किलोमीटर अंतरावर आहे. यादरम्यान सहा बंधारे आहेत. गिरणेला हिरवा, बहुळा, चितुर या मुख्य उपनद्यांसह लहान-मोठे नाल्यांमधून पाण्याची आवाक होत असते. समाधानकारक पावसामुळे सध्या गिरणा धरणातून २ हजार ५०० क्यूसेस तर बहुळा-दहिगाव प्रकल्पातून ११ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे कांताई बंधारा ओसंडून वाहत आहे. गिरणा नदीला आलेल्या पाण्यामुळे परिसरातील हजारो शेतकरी सुखावले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळांमुळे बळिराजा खचला होता. जीवनदायी असलेली नदी वाहत असल्याने त्याला नवी उमेद आली आहे.
हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली
कांताई बंधारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून अवघ्या ९ महिने ११ दिवसात पूर्ण झाला आहे. १८० कोटी लिटर क्षमता असून पाच किलोमीटर बॅकवॉटर आहे. दापोरा, दापोरी, खेडी, धानोरा, कढोली, वैजनाथ, नागझिरी, मोहाडी, टाकरखेडा, सावखेडा, बांभोरी, निमखेडी, आव्हाणा या गावांना बंधाऱ्याचा प्रत्यक्ष फायदा होत आहे. यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. शेकडो विहिरी बोअरवेलांचे भूजलस्तर उंचावले आहेत. यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
दळणवळणासह आर्थिकस्तर उंचावला
पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरी नगदी पिके घेऊ लागले आहेत. वर्षाला तीनदा पीक घेता येत आहे. केळी, कांदा, भाजीपाला, कापूस या बागायत पिकांकडे शेतकरी वळले आहेत. यामुळे आर्थिक चलन-वलन होऊन त्यांचा आर्थिकस्तर उंचावला आहे. तसेच कांताई बंधाऱ्याजवळ जोडरस्ता तयार करून दिला आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांना दळणवळणाची सुविधा निर्माण झाल्याने मुख्य बाजारपेठांपर्यंत त्यांना लवकर पोहचता येत आहे, याचा फायदा विद्यार्थ्यांसह, प्रवाशांनाही होत आहे.
बंधाऱ्याची ठळक वैशिष्ट्ये
जळगाव तालुक्यातील धानोरा आणि कढोली परिसरातील गिरणा नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची पाणी क्षमता १७९.१८ कोटी असून याचे पाणलोट क्षेत्र ९१३.६१ चौरस किमी. एवढे आहे. या बंधाऱ्याची लांबी गिरणेच्या पात्राप्रमाणे २४६ मीटर एवढी असून त्याची जास्तीत जास्त उंची ८.९२ मीटर एवढी आहे. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला असताना याचे बॅकवॉटर सुमारे ५.६६० मीटर पर्यंत जाते. बंधाऱ्याच्या भिंतींची उंची साडेचार मीटर असून ८१ दरवाजे ठेवण्यात आले आहेत.