<
जळगांव(प्रतिनीधी)- लोकशाहीचा महाराष्ट्रातील महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विविध राजकीय पक्ष व राजकारण धुरंधरांची उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी व जय्यत तयारी सुरु आहे,परंतु जळगांव ग्रामीण मतदार संघातून केवळ निवडणूक हा विषय डोळ्यासमोर न ठेवता विविध सामाजिक समस्या व जनतेच्या जिव्हाळ्याचा विषयांवर निरंतर ,नियोजनबद्ध व निर्णायक काम सदोदित चालू ठेवणा-या महाराष्ट्रातील प्रथम युवा सरपंच व राष्ट्रवादीच्या युवती प्रमुख यांनी विरोधकांच्या गोटात चांगलीच धडकी भरवली आहे.कारण सामान्य जनतेशी व विशेषतः महिलांशी पाटील यांचा असलेला दांडगा संपर्क व नवे पर्व युवा सर्व या राष्ट्रवादीच्या चाणक्य नितीमुळे कल्पिता पाटील विधानसभेच्या उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार ठरत आहेत.
प्रथम महिला युवा सरपंच व पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी व राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांनी दाखविलेल्या विश्वास सार्थ ठरवत पाटील यांनी मतदार संघात सातत्यपूर्ण जनसंपर्क ठेवत लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.युवा महिला चेहरा,उच्च शिक्षित,नम्रता,कर्तव्य दक्षता व सामान्यांची जाण व पवार कुटुंबीयांशी असलेली जवळीक या जोरावर त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सातत्यपूर्ण कार्य साकारत त्यांनी स्त्री सबलीकरण, स्री अन्याया विरुद्ध वाचा फोडणे, युवा मार्गदर्शन, युवती संवाद, महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप व जागृती करणे, वृक्ष रोपण मोहीमेस चालना देणे, शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण व न्याय मिळवून देणेसाठी वेळोवेळी आंदोलन करणे, महिलांचा सामाजीक सहभाग वाढवणे, शिक्षण, आरोग्य, रस्ते, या विषयी लोकांच्या समस्या जाणून घेऊन व सोडवण्यासाठी प्रयत्न करणे अशा व अजूनही लोकहिताच्या विविधांगांना स्पर्श करणारे विधायक कार्य कल्पिता पाटील करीत आहेत. त्यामुळेच कमी कालावधीत उच्च शिक्षणाचा चांगला वापर ग्रामीण विकासाठी करीत त्यांनी जनतेच्या मनात घर केले आहे. त्यामुळे असे नेतृत्व जनता सहज स्वीकारु शकते असा जाणकारांचा कयास आहे व जनेचे आशीर्वाद लाभल्यास प्रथमच युवा महिला आमदार म्हणून इतिहास घडणार आहे.