<
जळगांव – शहरात दोन दिवसांपूर्वी मेहरून तलाव परिसरात सायकल चालविण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाला कार ने धडक दिली व त्याचा मृत्यू झाला.कार चालक हा सुद्धा अल्पवयीन होता ही बाब माध्यमातून समजली.
पालकांना विनंती आहे की आपली मुले 18 वर्षाची पूर्ण झाल्या शिवाय व त्या नंतर लायसन्स काढल्याशिवाय मुलांना कार-टू व्हिलर चालवायला देऊ नका.
आपल्या घरी कार असेल टू व्हीलर असेल तरी घरच्या घरी गाडी शिकवू नका. आरटीओ मान्यता प्राप्त ड्रायविंग स्कूलच्या माध्यमातून तांत्रिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येते. त्या व्यतिरिक्त वाहन चालवताना मानसिक ताण-तणाव नसणे, समोरच्या रस्त्याचा अंदाज घेणे, रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज घेणे, मागच्या गाडीचा अंदाज घेणे, मानसिक संतुलन बनवून ठेवणे, उतारावर गाडी चालवणे, चढावावर गाडी चालवणे,पावसात गाडी चालवणे अशा विविध बाबतीत सविस्तर अशी माहिती देता येते.आपली मुलं 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर योग्य त्या ड्रायव्हिंग स्कूल ची निवड करून आपल्या मुलांना शिस्तीचा भाग म्हणून ड्रायव्हिंग स्कूल मार्फतच ट्रेनिंग घेऊन द्यावे.
मुलांच्या हाती कार किंवा दुचाकी देताना काही दिवस त्यांच्यासोबत राहावे जेणेकरून भविष्यामध्ये अपघातासारखे संकट येणार नाही याची काळजी घ्यावी. तलाव परिसरात झालेला अपघात याची झळ अल्पवयीन वाहन चालक या सोबत पालकांना सुद्धा बसते आणि त्यानुसार मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. ज्याप्रमाणे आपण मुलांना शाळा शिकण्यासाठी शाळेत पाठवतो त्याच प्रकारे ड्रायव्हिंग शिकायला सुद्धा ड्रायव्हिंग स्कूल मध्येच पाठवावे.अशी ड्रायव्हिंग शिस्त आयुष्यभर टेन्शन मुक्त ठेवेल.
आज आपण बघतो अनेक पालक अल्पवयीन मुलांना दुचाकी व चार चाकी वाहन मोठ्या अभिमानाने चालवायला देतात आणि माझा मुलगा कमी वयात बघा कशी गाडी चालवतो असा अभिमान बाळगतात.जळगांव मधे घडलेली घटना ही एकमेव घटना नाही. अशा अनेक घटना रोज शहरात, जिल्ह्यात, राज्यात,देशात घडत आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या गोष्टीपासून बोध घेऊन पालकांनी सावध व्हावे व आपल्या मुलांना ड्रायव्हिंग स्कूल मार्फतच गाडी शिकवून त्यांच्या हातात कार किंवा टूव्हीलर द्यावी जेणेकरून संभाव्य अपघात टळतील.
– ऍड जमील देशपांडे
अध्यक्ष-जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल. असोसिएशन जळगाव